नागपूर/चंद्रपूर : खराेखरच बापरे म्हणण्याची वेळ चंद्रपूरवर आली आहे, कारण चंद्रपूर देशातच नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. साेमवारी शहराचा पारा ४५.६ अंशावर पाेहचला. रविवारीही ते देशात पहिलेच हाेते. आता पुढील ५ दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सूर्याच्या ज्वाळांची भट्टी पेटल्यासारखे वाटतेविदर्भात सूर्याच्या ज्वाळांची भट्टी पेटल्यासारखी स्थिती आहे, कारण जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत चार शहरे विदर्भातीलच आहेत. चंद्रपूरनंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातीलच ब्रम्हपुरी शहर असून, जेथे साेमवारचे तापमान ४५ अंश होते. अमरावती पाचव्या क्रमांकावर आहे. येथे साेमवारचा पारा ४४.६ अंशावर गेला आहे. यादीत ४४.१ अंशासह अकाेला जिल्हा १२ व्या क्रमांकावर आहे.
जगातील सर्वात उष्ण १५ पैकी ११ शहरे भारतातीलजगभरातील सर्वात उष्ण १५ शहरांमध्ये ११ शहरे एकट्या भारतातील आहेत. विदर्भातील ४ शहरांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावरील झारसुगुडा येथे ४५.४ अंश तापमान नाेंदविण्यात आले. सहाव्या क्रमांकावर सिधी (४४.६), सातवे राजनांदगाव (४४.५), ९ व्या क्रमांकावर प्रयागराज व घूपुर (४४.३), ११ वे खजुराहाे (४४.२), १४ वे आदिलाबाद (४३.८) आणि १५ व्या क्रमांकावर रायपूर (४३.७) यांचा समावेश आहे.
हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील काही ठिकाणी पारा ४२ किंवा त्यापेक्षा अधिक नोंदविला जाईल.
काय काळजी घ्याल?
- पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी प्या
- टोपी घाला किंवा डोके-कानाला रुमाल बांधा
- सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात बाहेर जाणे टाळा.