खुशखबर! सीईटीने जाचक अट काढून टाकली; पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही नीट प्रवेशाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:48 IST2025-08-05T15:47:41+5:302025-08-05T15:48:20+5:30
सांगलीतील प्राध्यापकांचा पाठपुरावा

संग्रहित छाया
सांगली : वैद्यकीय प्रवेश घेताना बारावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गृहीत धरले जात नव्हते. हा अडथळा आता दूर झाला आहे. राज्य सीईटी सेलने २०२५ च्या प्रवेशविषयक माहिती पुस्तिकेत पुरवणी परीक्षेबाबतचा वादग्रस्त नियम वगळला आहे. सांगलीतील प्रा. नारायण उंटवाले यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता.
सीईटी सेलच्या या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सन २०२४ मध्ये झालेल्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीटमध्ये) बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. बारावी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी पुढील पुरवणी परीक्षेला बसतात. जास्त अभ्यास करून जादा गुण मिळवितात. पण, हे विद्यार्थी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आक्षेप घेत सीईटी सेलने त्यांना नीटसाठी प्रवेश नाकारला होता.
याविरोधात प्रा. उंटवाले यांनी शासनाकडे तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर राज्यपालांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. सीईटी सेलने त्यावर कार्यवाही करीत हा नियम रद्द केला आहे. विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेद्वारे जादा गुण मिळविले, तरी त्यांना नीटला प्रवेश देण्यास कळविले आहे. सन २०२५ च्या माहिती पत्रिकेतून पुरवणी परीक्षेची जाचक अट काढून टाकली आहे.
विद्यार्थ्यांना आपले गुण वाढविता यावेत, यासाठी बारावी बोर्डानेच त्यांना बेटरमेंटची संधी दिली आहे. मात्र, शासनाचाच एक भाग असलेल्या सीईटीला तो मान्य नव्हता. ही विसंगती दूर व्हावी म्हणून पाठपुरावा केला, त्याला यश आले. याचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना मिळणार आहे. - प्रा. नारायण उंटवाले, सांगली.