केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:44 IST2025-12-30T07:43:44+5:302025-12-30T07:44:32+5:30
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट
पुणे : शेतकऱ्यांना उसापोटी दिले जाणारे बिल आणि कारखान्यांना साखर विकून मिळणारा दर यात मोठी तफावत निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना ३०० रुपये प्रति क्विंटल तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे साखरेचा विक्री दर वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे राष्ट्रीय तसेच राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. त्यात या प्रश्नाबाबत अनुकूल निर्णय होईल, याची काळजी घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
१५ लाख टन साखर निर्यातीस परवानगीची गरज
हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारने १५ लाख टन साखरेच्या निर्यातीची परवानगी यापूर्वीच दिली आहे. तर पाच लाख टन निर्यातीबाबत तत्त्वतः मान्यता येण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली. मात्र, यात आणखी दहा लाख टन निर्यात करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरावरील साखर कारखाना महासंघाला सोबत घेऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर पवार यांनी शाह यांची वेळ घेऊन हा प्रश्न मांडू, असे आश्वासन दिले.