Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:18 IST2025-05-11T12:17:25+5:302025-05-11T12:18:56+5:30
India Pakistan Ceasefire violation: तात्कळ शस्त्रसंधी लागू करण्यावर सहमती झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री पुन्हा भारतावर निष्फळ हवाई हल्ले आणि गोळीबार केला. त्यामुळे पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरून टीका होत आहे.

Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
Ceasefire Violation: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान तात्काळ शस्त्रसंधी करण्यासाठी तयार झाले अशी घोषणा केली. त्यानंतर तीन-चार तासांतच पाकिस्तानी लष्कराने ट्रम्प यांना वाकुल्या दाखवत सीमेपलीकडून पुन्हा हवाई हल्ले केले. भारताने सहमती दर्शवल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधी लाथाडून लावल्याचे पुन्हा समोर आले. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाकिस्तानच्या विश्वासघातकी भूमिकेवर टीका केली. त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठाणे येथे माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "जेव्हा शस्त्रसंधी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ यांनी भारताच्या डीजीएमओशी चर्चा करून पुढाकार घेतला होता. दोन्ही देशांच्या संमतीने शस्त्रसंधी झाली होती. भारत नेहमी जो शब्द देतो, तो पाळतो. पण, पाकिस्तानचे हे कृत्य, हा विश्वासघातकीपणा आहे."
"यापूर्वीही त्यांनी अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे. मोदींनी त्यांना सुधारण्याची संधी देण्यासाठी केली होती, पण मला नाही वाटत की ते सुधरतील. आता रात्री त्यांनी जे केलं आहे, आपल्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न. पण, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळालं आहे", असेही शिंदे म्हणाले.
मोदींना माहिती होतं म्हणून त्यांनी...
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "आपले सैन्य पूर्णपणे तयार आहे. मोदींना कदाचित माहिती होतं की, असे कृत्य करतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी शस्त्रसंधीबद्दल ट्विटही केले नव्हते. पण, वारंवार अशी कृत्ये केल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. भारतीय लष्कर इतकं शक्तिशाली आहे की, पाकिस्तानला रात्री जशास तसे उत्तर रात्रीच दिले आहे."
"पाकिस्तानला माहिती आहे की, भारतासोबत लढणे सोप्पं नाहीये. भारतासोबत लढलो, तर पराभव होईल. आमचं अस्तित्वही मिटेल. मी तर म्हणेल की, कुत्र्याचं शेपूट असतं, ते सरळ नाही होत, ती वाकडीच राहते. त्यासाठी तिला कापावं लागतं. पाकिस्तान सुधरला नाही, तर राष्ट्रभक्त पंतप्रधान मोदी त्याचा पूर्ण बंदोबस्त करतील. विश्वासघात करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देतील", असेही शिंदे यावेळी म्हणाले.
नकाशावरून मिटवण्याची हिंमत
"मी आधीही म्हणालो की, जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवण्याची हिमंत भारतामध्ये आहे. शस्त्रसंधी करून हल्ले करत आहे. हा पाकिस्तानचा दुटप्पीपणा आहे. त्याला सगळे मिळून उत्तर देतील", असेही शिंदे यावेळी म्हणाले.