प्रचार थांबला, सासुरवाडी झाली नि:शब्द ! जावयाच्या निधनाने तेर सुन्न, गाव बंद ठेवून शोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:17 IST2026-01-29T10:17:05+5:302026-01-29T10:17:26+5:30
Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धाराशिवचे नाते अतूट राहिले आहे. जिल्ह्यातील तेर ही त्यांची सासुरवाडी. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागल्याने अजितदादा, पत्नी सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून उमेदवार आहेत. सकाळी ८ वाजताच त्यांचे ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ सुरू होते. अवघ्या अर्ध्या तासातच त्यांना विमान दुर्घटनेचा फोन आला.

प्रचार थांबला, सासुरवाडी झाली नि:शब्द ! जावयाच्या निधनाने तेर सुन्न, गाव बंद ठेवून शोक
तेर / धाराशिव - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धाराशिवचे नाते अतूट राहिले आहे. जिल्ह्यातील तेर ही त्यांची सासुरवाडी. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागल्याने अजितदादा, पत्नी सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून उमेदवार आहेत. सकाळी ८ वाजताच त्यांचे ‘डोअर टू डोअर कॅम्पेन’ सुरू होते. अवघ्या अर्ध्या तासातच त्यांना विमान दुर्घटनेचा फोन आला. गावात सगळीकडे जावयाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली अन् अख्खे तेर शाेकसागरात बुडाले.
बारामतीचे पवार अन् तेरच्या पाटील कुटुंबाचे राजकीय ऋणानुबंध महाराष्ट्राला माहीत आहेतच. १९८५ साली अजित पवार हे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्राताई यांच्याशी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर ४० वर्षे तेरशी अजितदादांचे नाते राहिले होते.
बुधवारच्या सकाळी निवडणुकीची लगबग सुरू होती. सुनेत्राताईंच्या भाचेसून अर्चना पाटील या तेर गटातून भाजपच्या उमेदवार आहेत. सकाळी ८ वाजताच त्यांनी घरोघर भेटी देत प्रचार सुरू केलेला. विठ्ठलनगर, अंजनीनगर भागात असताना त्यांना त्यांचे पती आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा फोन आला. त्याचक्षणी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करुन देत कार्यकर्त्यांना ‘मी येते’, इतकेच दोन शब्द सांगून तेर सोडले. कार्यकर्ते काही क्षण बुचकळ्यात पडलेले. तोवर अजितदादांच्या अपघाताची बातमी गावभर पसरली. पाहता पाहता संपूर्ण सासरवाडी डॉ. पाटील यांच्या गावातील वाड्यासमोर जमली. पक्षभेद विसरून सर्वच कार्यकर्तेही एकत्र आले. त्यांनी गाव बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.
गोष्ट एका लग्नाची
तेरचे डॉ. पद्मसिंह पाटील खा. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी १९८५ साली खुद्द डॉ. पाटील यांनीच शरद पवारांकडे सुनेत्राताईंचा हात अजितदादांच्या हाती देण्यासाठी प्रस्ताव मांडला.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम मुंबईतच डॉ. पाटील यांच्या बंधूंच्या घरी झाला. ३० डिसेंबर १९८५ रोजी दोघांची लग्नगाठ बांधली.
ती भेट ठरली अखेरची..
अजितदादा यांची तेरला शेवटची भेट पाच वर्षांपूर्वी झाली. त्यांचे मेहुणे अमर पाटील यांच्या निधनानंतर ते आले. त्यांचा अखेरचा दौरा नगरपरिषद निवडणुकीत झाला. नोव्हेंबरमध्ये आ. राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या विवाहाला हजर राहून नळदुर्गात त्यांनी सभा घेतल्याचे, असे डॉ. पाटलांचे सहकारी रामलिंग लामतुरे सांगतात..