“चोराला चोर म्हणणे देशात गुन्हा..,” राहुल गांधींवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:50 IST2023-03-24T15:50:02+5:302023-03-24T15:50:54+5:30

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली.

Calling a thief a thief is a crime in the country Uddhav Thackeray reaction after the action against Rahul Gandhi disqualify as mp | “चोराला चोर म्हणणे देशात गुन्हा..,” राहुल गांधींवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

“चोराला चोर म्हणणे देशात गुन्हा..,” राहुल गांधींवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

“चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्याच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 

"राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे, फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

रामदास आठवलेंनीही दिली प्रतिक्रिया
“अशा परिस्थितीत कोणत्याही खासदाराला अपात्र ठरवण्याचा अधिकार सभापतींना आहे. सूरत जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक होते, अध्यक्षांनी योग्य निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

काय म्हणतो कायदा?
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये खासदार आणि आमदारांना २ वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यासही बंदी घातली जाऊ शकते. याच कायद्यानुसार, राहुल गांधी यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे. 

राहुल गांधी यांच्यासमोर काय मार्ग?
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कायदेशीर मार्ग आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी वरच्या कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. जर वरच्या कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय रद्द केला तर राहुल गांधी यांची खासदारकी वाचू शकते. दरम्यान, या कारवाईनंतर काँग्रेस नेत्यांकडून सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Calling a thief a thief is a crime in the country Uddhav Thackeray reaction after the action against Rahul Gandhi disqualify as mp