मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 20:12 IST2019-03-18T20:07:34+5:302019-03-18T20:12:10+5:30
आळंंद ( कर्नाटक ) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या ...

मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका
आळंंद (कर्नाटक) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचे गाजर, नोटबंदीमुळे तसेच जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक व मध्यम व्यापारी नुकसानीत आले आहेत. विम्याच्या माध्यमातून हजारो कोटींचा घोटाळा प्रकरणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. काँग्रेसच आगामी काळात शेतकरी व देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकेल असे आश्वासक उद्गार अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी कलबुरगी येथे काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीमध्ये बोलताना काढले.
पंतप्रधान मोदींच्या कार्यपध्दतीवर कडाडून टीकाप्रहार करताना राहुल गांधी म्हणाले, मोदी हे २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देत सत्तेवर आले, पण आजपावेतो त्यांनी एकाही आश्वासनांची पूर्तता केली नाही. राफेल करारात मोठा घोटाळा केला. फ्रान्सच्या अध्यक्षांनीच राफेलच्या कराराचे वास्तव उघडे केले आहे. भारत सरकारची एचएएल कंपनी असताना अननुभवी अनिल अंबानीना राफेलचे कंत्राट दिलेच कसे? असा सवाल केला.
कॉंग्रेस संसदीय पक्षाचे नेते व कलबुरगी मतदार संघाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत आम्ही दिलेली आश्वासने पाळली आहेत व यापुढेही शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू असे उद्गार काढले. मोदींनी उद्घाटन केलेल्या योजना आमच्या काळातीलच आहेत,पण श्रेय मात्र ते घेत आहेत असे खरगे म्हणाले.
-------
काँग्रेसने आश्वासने पाळली
गरजू शेतकºयांची कर्जे माफ करण्याऐवजी मोदी यांनी उद्योगपतींची ३ लाख १५ हजार कोटींची कर्जे माफ केली. बेरोजगार तरुणांना वर्षाकाठी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या पाच वर्षांत फक्त २७ लाख जणांनाच रोजगारच मिळू शकला. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येण्याऐवजी सर्वसामान्यांना बाहेर ताटकळत ठेऊन आतल्या दारातून काळ्याबाजारवाल्यांचा पैसा मात्र पांढरा केला गेला. हे सर्व आजच्या तरुणाईला व सर्वसामान्य जनतेला कळायला हवे.
आम्ही आजपर्यंत जी आश्वासने दिली आहेत ती पाळली आहेत. २००९ मध्ये कलबुरगी येथे आम्ही दिलेले ३७१( जे) कलम लागू करण्याचे आश्वासन पाळले असून, त्यामुळेच या मागास भागातील तरुणांना उच्च शिक्षण प्रवेशामध्ये व नोकरी मिळवण्यामध्ये सवलती मिळत आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.