"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:06 IST2025-11-03T14:01:22+5:302025-11-03T14:06:07+5:30
आता मतचोरीचा जो मुद्दा आम्ही उचलला. तो पुराव्यानिशी जनतेसमोर आला. सरकार निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे परंतु आता सरकार मतदार निवडायला लागलेत हे घातक आहे असं शेलारांनी म्हटलं.

"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
मुंबई - आशिष शेलारांवर मी कधी बोलत नाही. मात्र त्यांचे आज जाहीर आभार मानायला हवेत. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवले आहे. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिपाक आहे. आशिष शेलारांनी पत्रकार परिषद अशावेळी घेतली जेव्हा मुख्यमंत्री बिहारमधून प्रचार करून आलेत. मतदार यादीत गोंधळ आहे हे आशिष शेलारांनी सिद्ध केले. आम्ही पूर्ण मतदार यादीत सुधारणा करा अशी मागणी करत आहोत. आशिष शेलारांनी आज धाडस दाखवले. सहसा त्यांच्या नेत्याविरोधात बोलण्याचं धाडस सहसा भाजपावाले करत नाही. परंतु शेलारांनी थेट मोदी-शाहांपासून सगळ्यांवर केला आहे. कारण दुबार मतदारांचा हा आरोप त्यांनी लोकसभेपासून काढलेला आहे. सरकार तुमचे असताना विरोधक घोटाळे करतायेत म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात. आज आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाकडून हिंदू मुस्लीम करण्याचा केविळवाणा प्रयत्न सुरू आहे. आम्ही अख्ख्या यादीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे ज्यात हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई सगळेच आलेले आहेत. आम्ही काही उदाहरणे दिली, ज्यात वडील हिंदू, मुलगा मुस्लीम आहे. वडिलांचे नाव गोविंद शंकर माने तर मुलाचे नाव दिलशाद नौशाद खान असे मतदार आहेत. यात हिंदू मुस्लीम दोन्ही आले. आशिष शेलारांचं काहीतरी बिनसले आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवून दाखवले आहे. आमच्या आरोपांना किंमत नसेल तर आशिष शेलारांनी जी माहिती दिलीय त्यावर बोला असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोगाविरोधात आम्ही जसा मोर्चा काढला तसा भाजपाने कधी मोर्चा काढला हे पाहिले नाही. आम्ही निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो तसेही ते भेटले नाहीत. आम्ही आता ज्ञानेश कुमार यांना भेटणार आहोत. कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचाही प्रयत्न करणार आहोत. जेव्हा निवडणूक आयुक्तांकडे जायचे होते तेव्हा आम्ही भाजपालाही आमंत्रण दिले होते. जर तुम्ही मतदार याद्यांबाबत एवढी वर्ष मागणी करताय मग त्यांनी त्यादिवशी यायला हवे होते. आता मतचोरीचा जो मुद्दा आम्ही उचलला. तो पुराव्यानिशी जनतेसमोर आला. सरकार निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे परंतु आता सरकार मतदार निवडायला लागलेत हे घातक आहे. दुबार मतदार यादीवर जे निवडणूक लादतायेत हे खरे नक्षलवादी आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपालाही मतदार यादीबाबत शंका असेल तर त्यांनीही आमच्यासोबत कोर्टात यावे. शेलारांनी पुराव्यानिशी आरोप केले आहेत. त्यांना जर आमचे आरोप पटले असतील तर शेलारांनीही कोर्टात यावे हे आमचे आमंत्रण आहे. मग यादीतील जे कुणी तुमच्या लेखी हिंदू मुस्लीम दुबार असतील ते सर्व काढा. संपूर्ण यादीत आम्ही सुधारणा मागत आहोत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. सोबतच आम्ही नावानिशी मतदार यादी चेक करत आहोत. आपल्या मतदार यादीत दुसरे कुणी घुसलंय का ते नागरिकांनीही पाहायला हवे. बोगस मतदारांनी मतदानाला यायचे धाडस करूच नये असा सूचक इशाराही ठाकरेंनी दिला.