रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:34 IST2025-07-28T17:33:19+5:302025-07-28T17:34:51+5:30
रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी बुडाली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांनी पोहोत समुद्रकिनारा गाठून स्वत:चा जीव वाचवला.

रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी बुडाली. या दुर्घटनंतर समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या तीन खलाशांचे मृतदेह सोमवारी सापडले. दुर्घटनाग्रस्त बोट शनिवारी सकाळी सात वाजता मासेमारीसाठी निघाली. परंतु, ८.३० वाजताच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ जोरदार लाटा उसळल्या आणि बोट समुद्रात उलटली. त्यावेळी बोटीत एकूण आठ जण होते. यातील पाच जणांनी पोहोत समुद्रकिनारा गाठला. परंतु, उर्वरित तिघांना मृत्यूने कवटाळले.
रायगडमध्ये आठ खलाशांसह बोट समुद्रात उलटल्याची माहिती कळताच स्थानिक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि तटरक्षक दलांनी घटनास्थळी पोहोचून बेपत्ता झालेल्या तीन खुलाशांचा शोध सुरू केला. बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. नरेश राम शेलार, धीरज कोळी, मुकेश यशवंत पाटील अशी मृतांची नावे आहेत.
उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची (तुळजाई) बोट समुद्रात उलटली. शनिवार सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हेमंत बळीराम गावंड (वय, ४५), संदीप तुकाराम कोळी (वय, ३८), रोशन भगवान कोळी ( वय, ३९), शंकर हिरा भोईर (वय, ६४) आणि कृष्णा राम भोईर ( वय, ५५) यांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. त्यांना ताबडतोब अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती स्थिर आहे.