नागपूरातील आमदार निवासात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:12 IST2018-07-04T00:12:25+5:302018-07-04T00:12:38+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृताचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते.

नागपूरातील आमदार निवासात आढळला मृतदेह
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृताचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे स्वीय सहायक संदीप वरकडे यांच्यासोबत सोमवारी अग्रवाल नागपुरात आले होते. आमदार निवासातील ४६ क्रमांकाच्या खोलीत ते सोमवारी रात्री झोपायला गेले.
सकाळी वरकडे तेथे आले. प्रतिसाद देऊनही कडी न उघडल्याने त्यांनी बाजूला असलेल्या खिडकीतून बघितले असता अग्रवाल अर्धे कॉटवर तर अर्धे खाली लोंबकळल्यासारखे पडून दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे ताफ्यासह तेथे पोहोचले. दाराला धक्का मारून आत प्रवेश केल्यावर अग्रवाल मृतावस्थेत आढळून आले.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. मात्र नेमके कारण स्पष्ट न झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे़