उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:39 IST2025-12-21T15:33:50+5:302025-12-21T15:39:28+5:30
ShivSena UBT & MNS Alliance : नगरपालिका निवडणुकीत पैशांची गारपीट झाली त्यापुढे कोण टिकणार? ३० कोटी बजेट असणार्या नगरपालिकेसाठी भाजपा-शिंदेसेना १५० कोटी खर्च करत होते असा आरोप संजय राऊत यांनी केला.

उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांमध्ये उद्धवसेना आणि मनसे यांच्यातील जागावाटपाची चर्चा संपली आहे. येत्या १-२ दिवसांत या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
माध्यमांशी राऊत यांनी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, मनसे-शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा संपली. सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली तरी युतीत काही गोष्टी कटुतेने सोडवाव्या लागतात. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो. त्यात आम्ही यशस्वी झालो असं वाटते. आजची ही बैठक शेवटची होती असं आम्ही मानतो. पुढील १-२ दिवसांत युतीची घोषणा होईल असं त्यांनी सांगितले.
काँग्रेसची समजूत काढण्याचा प्रयत्न
तर काँग्रेस हा महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसची स्वत:ची व्होटबँक आहे. आमच्या मविआतला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. लोकसभा, विधानसभा एकत्र लढल्यानंतर आम्ही महापालिका, जिल्हा परिषदा एकत्र लढावे ही आमची आणि त्यांची इच्छा आहे. परंतु त्यांच्या राज ठाकरेंबाबत काही अडचणी आहेत. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. भाजपाचा पराभव करायचा असेल तर सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील असं आम्ही त्यांच्या दिल्लीतल नेत्यांचीही बोललो. महाराष्ट्रातील हायकमांडची बोललो. त्यांचे मन वळवण्याचा, चर्चा करण्याचे काम सुरू आहे. अजूनही ७२ तास आहेत. काँग्रेस आणि आमच्यात कटुता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून घेतो. जरी ते वेगळे लढत असले तरी आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवू असं संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत पैशांची गारपीट झाली त्यापुढे कोण टिकणार? ३० कोटी बजेट असणार्या नगरपालिकेसाठी भाजपा-शिंदेसेना १५० कोटी खर्च करत होते. सत्ताधारी पक्षातच कोण पुढे जातंय ही स्पर्धा होती. स्पर्धा विरोधकांशी नव्हती. भाजपानं मशिन फिक्स केलीय, त्यामुळे विधानसभेसारखी आकडेवारी या निकालात दिसत आहे. नगरपालिकांमध्ये महायुतीचा विजय झाला मग एकमेकांविरोधात का लढत होता? हा पैशांचा खेळ, सत्तेचा गैरवापर आहे. श्रीवर्धनला आत्ताच नगराध्यक्ष निवडून आला त्याला पैशाच्या बळावर तुम्ही फोडण्याचा प्रयत्न करताय. हा सत्तेचा आणि पैशाचा विजय आहे. हे फार काळ चालत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी नगरपालिका, नगरपरिषद निकालावर दिली.