मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:37 IST2025-12-12T12:37:16+5:302025-12-12T12:37:40+5:30
योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी सांगितले.

मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जायचे असं भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात एकमत झाले आहे. गुरुवारी रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातच भाजपाने केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार मुंबईतील मुस्लीम बहुल भागात भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांनाच अधिक पसंती असल्याचं नमूद करण्यात आले आहे.
मुंबईत ७० टक्के मुस्लीम समाज असलेल्या १८ वार्डाचा सर्व्हे भाजपाने केला आहे. या भागात महायुतीत शिंदेसेनेचे उमेदवार दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे. मुस्लीम महिलांमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आहे. मुंबईत १८ जागी ५० टक्के तर ७ जागांवर ३५ टक्के मुस्लीम समाज आहे. या भागात भाजपापेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळतेय असं सर्व्हेमध्ये पुढे आले आहे.
तर या सर्व्हेबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या जागांबाबत काही चर्चा नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्यात कुठेही भेदभाव केला नाही. सर्वसमावेशक अशा योजना आम्ही राबवल्या. विकास करतानाही काही फरक केला नाही. लोकाभिमुख कल्याणकारी लाडकी बहीण योजना आणतानाही आम्ही कुठेही भेदभाव केला नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुठल्याही विषयावर, मुद्द्यांवर भाजपा-शिंदेसेना यांच्यात मतभेद नाहीत. आमचा एकमेकांसोबत समन्वय आहे. योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल. परंतु २२७ वार्डात महायुतीचा उमेदवार लढेल आणि महायुतीचा महापौर होईल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला. त्याशिवाय मुंबई महापालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना नेतृत्व दिल्याने भाजपाची नाराजी आहे. मलिकांसोबत युती नाही अशी भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबईत भाजपा-शिंदेसेना राष्टवादी वगळून निवडणुकीला सामोरे जाईल का हे पाहणे गरजेचे आहे.