भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती

By यदू जोशी | Updated: July 22, 2025 06:50 IST2025-07-22T06:50:47+5:302025-07-22T06:50:58+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशी आपापल्या मतदारसंघातील पाच कामे भाजपच्या आमदारांनी सुचवावीत, ती प्राधान्याने केली जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

BJP's new formula; Every MLA will have five tasks! Strategy for municipal elections | भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती

भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती

यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशी आपापल्या मतदारसंघातील पाच कामे भाजपच्या आमदारांनी सुचवावीत, ती प्राधान्याने केली जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आमदारांनी अशा कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाला देणे सुरू केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवडाभर राज्याच्या विविध भागांतील भाजप आमदारांच्या स्वतंत्र बैठका वर्षा निवासस्थानी घेतल्या. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काय रणनीती असावी, याबाबत आमदारांची मते जाणून घेतली.

आपल्या मतदारसंघात सर्वोच्च प्राधान्यक्रमाची कोणती पाच कामे आहेत, त्याची यादी द्या, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकांमध्ये सांगितले. प्रदेश भाजप कार्यालयाने आणि मुख्यमंत्री कार्यालयानेही अशी कामे सुचविण्याच्या सूचना आमदारांना दिलेल्या होत्या. त्यानुसार आता कामे मार्गी लावली जाणार आहेत.

व्यापक सार्वजनिक हित ज्यात आहे अशी कामे, काही वर्षांपासून अडलेली अशी कामे ज्यामुळे लोकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होईल, अशी कामे जी लगेच झाल्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल एक चांगला संदेश जाईल; ती सुचविण्यास सांगण्यात आले आहे. मतदारसंघात सरकारबाबत एक चांगली भावना निर्माण होईल, अशीच कामे भविष्यातही सूचवा, असे आमदारांना सांगण्यात आले आहे.

मुंबईत शिंदेंना सोबत घेऊनच लढणार
मुंबईसह राज्यात सर्वत्र महायुती म्हणूनच आपल्याला लढायचे आहे. मुुंबईत शिंदेसेना आणि अजित पवार गट हेच आपले मित्र असतील. मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल, असा निर्धार आपल्याला करायचा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील आमदारांच्या रविवारी रात्रीच्या बैठकीत स्पष्ट सांगितले.

जास्त बोलू नका
आमदारांच्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘माध्यमांशी जास्त बोलू नका’ अशी ताकीद दिली. माध्यमांशी बोलण्याची जबाबदारी ज्यांना दिली आहे ते बोलतील, तुम्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित करा. बोलल्याने उगाच वाद ओढावतात, असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाकरे बंधू एकत्र आले तर...
उद्धव-राज ठाकरे मनपा निवडणुकीत एकत्र आले तर काय होऊ शकते यावर आमदारांची मते बैठकीत जाणून घेण्यात आली. काही प्रमाणात नक्कीच फरक पडेल पण मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे दोघांच्या युतीने त्यांची सत्ताच येईल, असे अजिबात नाही, असा आमदारांचा सूर होता.

मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारांना सकारात्मक प्रतिसाद
आपण आठवडा-पंधरा दिवसांतून एकवेळा काही तास फक्त आमदारांसाठी द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, अशी गळ विविध बैठकांमध्ये आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली होती. फडणवीस यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: BJP's new formula; Every MLA will have five tasks! Strategy for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.