विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:27 IST2025-12-23T06:27:06+5:302025-12-23T06:27:32+5:30
नगरपालिका-नगरपंचायत निकालाचे उमटू लागले पडसाद; बावनकुळे म्हणतात, मंत्रिपद अन् जय-पराजयाचा काहीही संबंध नाही

विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/चंद्रपूर : काही वर्षांपूर्वीपर्यंत भाजपचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत पक्षाची वाताहत झाल्यातून वादाला तोंड फुटले आहे. माजी मंत्री आणि या जिल्ह्यातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाकडून आपली ताकद कमी करण्यात आली असा आरोप तर केलाच शिवाय चंद्रपूरसह चार जिल्ह्यांना मंत्रिपद न दिल्याबद्दल जाहीर नाराजी बोलून दाखविली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व मुनगंटीवार यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे हंसराज अहीर यांनी मुनगंटीवार यांची विधाने खोडून काढली.
चंद्रपूर जिल्ह्यात ११ पैकी केवळ एक नगर परिषद आणि एक नगर पंचायत भाजपला जिंकता आली. जिल्ह्याचे नेते असलेले मुनगंटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्यानंतर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला. काँग्रेसच्या नेतृत्वाकडून आमच्या जिल्ह्यातील त्यांच्या नेत्यांना बळ दिले जाते, पण आमच्या पक्षात माझी ताकद कमी केली जात असल्याचे म्हणत त्यांनी तोफ डागली. विधानसभेत सरकारला खिंडीत पकडणारे मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
माजी प्रदेशाध्यक्ष असलेले बावनकुळे यांनी पलटवार केला. नागपुरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपद आणि निवडणुकीतील जय-पराजयाचा काहीही संबंध नसतो. चार जिल्ह्यांत (चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) मंत्रिपद नसल्याचा फटका चंद्रपूरमध्ये बसल्याचे मुनगंटीवारांनी म्हटले असले तरी मंत्रिपद आणि निवडणूक विजय यांचा थेट संबंध जोडणे योग्य नाही.
मुनगंटीवारांच्या भावना समजण्यासारख्या असल्या, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नेहमीच पाठबळ दिले आहे. यावेळी ते मंत्री बनू शकले नसले, तरी ते राज्याचे नेते आहेत. राज्यातील जनतेला त्यांचे नेतृत्व मान्य आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. चंद्रपूरमधील पराभवावर पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या संदर्भात मुनगंटीवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि चंद्रपूर महापालिका भाजप निश्चितच जिंकेल, असे बावनकुळे म्हणाले.
आज मला वाटते ते तेव्हा बावनकुळेंना वाटायचे : मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र बावनकुळे यांना अवघ्या सहा वर्षांपूर्वीच्या विजनवासाची आठवण करून दिली आहे. मंत्रिपदाचा संबंध नसतो वगैरे आज बावनकुळे साहेबांना वाटणे साहजिक आहे; पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती कमी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते. मी कधीच नाराज असत नाही. महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली, असे सांगत मुनगंटीवारांनी नाराजीचे आरोप फेटाळले.
योग्यवेळी योग्य सल्ला देणे
ही पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. कार्यकर्ते माझ्यापर्यंत जी भूमिका पोहोचवतात, ती मांडणे हे माझे कर्तव्य आहे. मला मंत्रिपद न दिल्याची नाराजी नाही; नाराजी जर कुणाची असेल तर ती जनतेची आहे. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रिपदही येते आणि जाते. शेवटच्या श्वासापर्यंत कोणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नसतो, असे मुनगंटीवार म्हणाले.
हंसराज अहिर यांनीही दिले दाखले
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर वादात उडी घेताना म्हटले की, मंत्रिपद आणि निवडणुकीतील विजय याचा परस्पर काहीही संबंध नाही असे स्पष्ट करत १९९६ मध्ये काँग्रेसचे शांताराम पोटदुखे केंद्रीय अर्थराज्यमंत्री होते. तेव्हा मी स्वतः लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये मी मंत्री असताना काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी माझा पराभव केला, असे दाखले देत इथे मंत्रिपदाचा काय संबंध आहे, असा टाेला अहीर यांनी लगावला.