रत्नागिरी-सिंधुदूर्गवर भाजपचाच दावा, तोही पर्मनंट; नारायण राणेंनी लढणार की नाही केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 16:10 IST2024-02-19T16:09:11+5:302024-02-19T16:10:43+5:30
राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघातून त्यांनाच उभे केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच हा मतदारसंघ असल्याची वक्तव्ये केली होती.

रत्नागिरी-सिंधुदूर्गवर भाजपचाच दावा, तोही पर्मनंट; नारायण राणेंनी लढणार की नाही केले स्पष्ट
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीत कोण दावा सांगणार यावरून सुरु असलेल्या दाव्यांना आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे. तर राणेपूत्र काही केल्या हा मतदारसंघ सोडायला तयार नाहीत. राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी न दिल्याने या मतदारसंघातून त्यांनाच उभे केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. यावरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचाच हा मतदारसंघ असल्याची वक्तव्ये केली होती. यावर नारायण राणे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा आणि तो दावा पर्मनंट असणार असल्याचे नाराय़ण राणे म्हणाले. मी उमेदवार असेल का हे वरिष्ठ ठरवतील. परंतु कमळ निशाणीवरचाच उमेदवार नक्की असेल. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. माझ्या संदर्भातील निर्णयावर निवडणुकीच्या अगोदर बोलणे उचित नाही. देशवासीयांचा मूड मोदीच असणार आहेत, असे राणे म्हणाले.
मोदी सरकारची गॅरंटी, विश्वास, अबकी बार मोदी की गॅरंटी आणि जनतेचा विश्वास आहे. आम्ही 48 च्या 48 जागा जिंकणार आहोत. भाजपमध्ये कोणी येईल त्याचे स्वागत करतो. आपल्या माणसांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामुळे अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असेही राणे म्हणाले.