Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:23 IST2025-12-21T12:21:43+5:302025-12-21T12:23:38+5:30
Maharashtra Nagaradhyaksha Winners 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २८८ नगराध्यक्ष पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदांचे शतक पूर्ण केले असून इतर पक्ष पिछाडीवर आहेत.

Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
Maharashtra Local Body Election Results 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा जोरदार कामगिरी केली आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शंभराहून अधिक ठिकाणी भाजपचे कमळ फुले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र चांगली प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षापैकी काँग्रेसलाच चांगले प्रदर्शन करता आले आहे.
राज्यातील २८८ नगराध्यक्षपदाच्या सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात तीन ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. तिथे भाजपने आधीच गुलाल उधळलेला आहे.
शिंदे-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती?
नगराध्यक्षपदाच्या २८८ पैकी १२२ जागांवर भाजपने विजय मिळवत मुसंडी मारली आहे. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ५३ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही ३९ ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यश मिळाले आहे.
महाविकास आघाडीत कोणाचे किती नगराध्यक्ष?
विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरली आहे.
महाविकास आघाडीत सर्वाधिक नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले आहेत. काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३४ ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ०७ नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाकरेंची शिवसेना तळाला राहिली असून, ०८ नगराध्यक्षच विजयी झाले आहेत.
अपक्षांची कामगिरी चांगली
महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसपेक्षाही जास्त ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले आहेत. २५ नगराध्यक्ष अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
तीन नगरपरिषदांमध्ये भाजप बिनविरोध
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने जळगावमधील जामनेर, सोलापूरमधील अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या तीन नगर परिषदांमध्ये विजयाचा गुलाल आधीच उधळला. या नगर परिषदांच्या नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या 3 नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या आधीच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या बिनविरोध जिंकल्या आहेत.