मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयात राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:32 IST2024-12-19T19:32:06+5:302024-12-19T19:32:56+5:30

BJP Workers Attack Congress Office In Mumbai: एकीकडे संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीवरून काँग्रेस आणि भाजपाचे नेते आमने-सामने आले असतानाच मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत धडक दिली. यावेळी भाजपा युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.

BJP Workers Attack Congress Office In Mumbai: Ruckus at Congress office in Mumbai, vandalism by BJP workers, police lathicharge on protesters | मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयात राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार

मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयात राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काढलेल्या कथित अवमानकारक उदगारांवरून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. आज संसदेपासून देशातीली विविध भागात अमित शाह यांच्या या विधानाविरोधात तीव्र पडसाद उमटले. एकीकडे संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीवरून काँग्रेस आणि भाजपाचे नेते आमने-सामने आले असतानाच मुंबईतीलकाँग्रेसच्या कार्यालयावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत धडक दिली. यावेळी भाजपा युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी जोरदार लाठीमार करत या आंदोलकांना घटनास्थळावरून पांगवले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आज संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपाच्या कार्यकत्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील फोर्ट परिसरातील कार्यालयावर चाल केली. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते आणि कार्यालयात उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात दगडफेक करून मालमत्तेचं नुकसान केलं. तसेच काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोंवर शाईफेक केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करत त्यांना काँग्रेसच्या कार्यालयातून हुसकावून लावले.

आता या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या हल्ल्याबाबत म्हणाले की, भाजपाच्या अशा भ्याड हल्ल्यांना काँग्रेस भिक घालणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाच्या गुंडशाही विरोधात काँग्रेस लढत राहणार. काँग्रसने जुलमी, अत्याचारी इंग्रजांशी लढून १५० वर्षांच्या ब्रिटीश सत्तेला देशातून हाकलून लावले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला न मानणा-या भाजपाच्या गुंडांविरोधात काँग्रेस लढेल आणि संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजेल असेही नाना पटोले म्हणाले. 

Web Title: BJP Workers Attack Congress Office In Mumbai: Ruckus at Congress office in Mumbai, vandalism by BJP workers, police lathicharge on protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.