दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 08:35 IST2025-09-30T08:34:45+5:302025-09-30T08:35:49+5:30
शिवाजीपार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून भाजप व उद्धवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दसरा मेळावा रद्द करून होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा सल्ला उद्धवसेनेला दिला.

दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
मुंबई : शिवाजीपार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून भाजप व उद्धवसेनेत जुंपली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दसरा मेळावा रद्द करून होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा सल्ला उद्धवसेनेला दिला. त्यावर उद्धवसेनेचे आ. महेश सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातींवर केलेला लाखो रुपयांचा खर्च पूरग्रस्तांना द्या, असे सांगत पलटवार केला.
मुख्यमंत्री असताना कृती न करता घरात बसून राहिले त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटायचे. पण, आता नुसता थयथयाट असेल. सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च करण्यापेक्षा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्या, असा टोला उपाध्ये यांनी लगावला. उपाध्ये यांच्या टीकेला उत्तर देताना आ. सावंत यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती लावल्या. त्यावर खर्च करण्याऐवजी भाजपने पूरग्रस्तांना मदत द्यायला हवी होती. पूरग्रस्तांना आमची मदत सुरू असून ती आ. कैलास पाटील व खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे देत आहोत, असा पलटवार केला.
ही आमची परंपरा
शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा ही आमची परंपरा आहे. सीमेवर लढताना सैनिक वारा-वादळ काही बघत नाही. वाघ बंदिस्त ठिकाणी नव्हे तर जंगलात, मैदानात फिरतात. विभाग प्रमुखांच्या बैठकीत प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे काही झाले तरी मेळावा होणारच, असेही आ. सावंत यांनी सांगितले.