भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:27 IST2025-11-17T14:27:02+5:302025-11-17T14:27:58+5:30
भाजपाविरोधी राजकीय पक्षांसोबतच हिंदुत्ववादी संघटना, आरएसएस कार्यकर्ते यांनीही चौधरी यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतला.

भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
मुंबई - पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने गंभीर आरोप केले होते, त्या काशिनाथ चौधरींनाच भाजपात पक्षप्रवेश दिला होता. भाजपाचा हा पक्षप्रवेश अनेकांच्या भूवया उंचावणारा होता. यावर विरोधकांकडून हिंदुत्ववादी संघटनांकडून टीका होऊ लागल्यानंतर भाजपाने यू टर्न घेतला आहे. डहाणू येथील काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र पाठवून काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याचं कळवले आहे. काशिनाथ चौधरी हे शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडात भाजपाने काशिनाथ चौधरी यांना प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशिनाथ चौधरी यांना अलीकडेच भाजपात प्रवेश देण्यात आला. भाजपा खासदार हेमंत सावरा आणि स्थानिक नेत्यांनी त्यांना पक्षात घेतले. मात्र यावरून सोशल मीडियावर भाजपाविरोधात विरोधकांनी टीका केली.
भाजपाविरोधी राजकीय पक्षांसोबतच हिंदुत्ववादी संघटना, आरएसएस कार्यकर्ते यांनीही चौधरी यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र दिले आहे. त्यात काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशा सूचना केल्या. काशिनाथ चौधरी यांच्यासह २-३ हजार कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र २४ तासांच्या आत भाजपाला चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती द्यावी लागली आहे.
काय आहे पालघर साधू हत्याकांड?
महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यात साधू चिनमयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ही घटना घडल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले होते. या घटनेतील मुख्य सूत्रधार काशिनाथ चौधरी आहेत असा आरोप भाजपाने केला होता. मात्र याच काशिनाथ चौधरींना भाजपाने पक्षप्रवेश दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.