“कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही”; खोक्यावरील कारवाईनंतर सुरेश धस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:54 IST2025-03-16T19:49:21+5:302025-03-16T19:54:20+5:30
BJP Suresh Dhas News: वन विभागाने कोणतीही नोटीस न बजावता घर पाडले. ते कोणत्या नियमांनी त्यांनी केले, याचे उत्तर मिळाले, तर बरे होईल. त्याला तात्पुरता दिलासा देऊन पुनर्वसनाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करू, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

“कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही”; खोक्यावरील कारवाईनंतर सुरेश धस स्पष्टच बोलले
BJP Suresh Dhas News:बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच 'खोक्या' उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड पोलीस सतीश भोसले याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. तत्पूर्वी, सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वनविभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली. यावरून भाजपा नेते सुरेश धस यांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“घर पेटवले, घरातील लहान मुलींना मारले, आतापर्यंत काहीच बोललो नाही पण...”; खोक्याची बहीण भावुक
मीडियाशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, त्याचे घर पाडले आहे. ते कोणत्या नियमांनी त्यांनी केले, याचे उत्तर आम्हाला मिळाले, तर बरे होईल. जेवढा मोठा त्याला करून दाखवला, तेवढा मोठा तो नाही. आता त्याची परिस्थिती काय झाली, हे पाहा ना. आता राहायला घरही नाही. काहीच नाही. चुकला असेल, तर त्याला त्या पद्धतीने शिक्षा मिळायला हवी. परंतु, वन विभागाने कोणतीही नोटीस न बजावता त्याचे घर पाडले. हा नियम कोणता आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत आम्ही गांभीर्याने विचार करू. तात्पुरता दिलासा देण्याबाबत विचार करू, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
“कायद्याने शिक्षा द्या, हे योग्य नाही”; खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवल्यावर दमानियांचा संताप
कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही
मी आता तिथे जाणार आहे. वन खात्याच्या काही लोकांना बोलावले आहे, त्यांच्याशी मी बोलतो. कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही. ती ॲक्शन का घेण्यात आली? हे सुद्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मी बोलणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सतीश भोसले याच्या बहिणीने याबाबतीत प्रतिक्रिया दिली होती. सतीश भोसले माझा भाऊ आहे. मी या प्रकरणात आजपर्यंत आले नव्हते. त्याची जी काही चौकशी चालू आहे ते आम्ही मोबाइलवर पाहात होतो. जो काही अन्याय होतोय तो खरा आहे का खोटा वगैरे कळेलच. पोलिसांची चौकशी सुरू आहे. ही कायदेशीर चौकशी आम्हाला मान्य आहे. पण बुलडोझरने त्यांचे घर पाडले. २-४ तासांनी असे समजले की, त्यांचे घर पेटवून दिले. आम्हाला रात्री समजले. आम्ही सकाळी ताबडतोब इथे आलो. त्यांचे घरदार पाडण्यात आले. लहान मुलींना मारहाण झाली. त्यांच्यांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. आमची विनंती एवढीच आहे की, आम्हाला न्याय मिळवून द्यावा. हे सगळे करणाऱ्या लोकांना अटक करा, अशी मागणी खोक्या भोसलेच्या बहिणींनी केली.
दरम्यान, सतीश भोसले चे घर जाळले? का? खूप खूप खूप वाईट वाटले. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप खूप चुकीचे आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळले? नाही हे योग्य नाही. Really feeling very bad, असे सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचे घर पाडल्यानंतर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.