BJP Suresh Dhas News: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सुरेश धस उपस्थित होते. तसेच सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली.
किशोर फड, संगीत दिघोळे यांच्या मातोश्रींना आणि त्यांच्या पत्नींना भेटायला परळीला जाणार आहे. पाच वर्ष बीड जिल्ह्यांत काय चालले आहे ते सगळ्यांना माहिती आहे. धनंजय मुंडे यांना सगळे माहिती आहे. आकांना त्यांच्या आकांनी पाठिंबाच दिला आहे, अशी टीका सुरेश धस यांनी केली. वाल्मीक कराडच्या सगळ्या गँग मोक्कामध्ये गेल्या पाहिजेत. वाल्मीक कराडने लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवले आहे, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी मागितला नाही
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोळंकी यांनी राजीनाम्याची मागणी केली. मी आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आका म्हणजे वाल्मीक कराड सगळ्या प्रकरणांत आहे. वाल्मीक कराडची चौकशी झाली पाहिजे. खंडणीबाबत सातपुडा बंगल्यावर बैठक झाली हे खात्रीने सांगतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा काय करायचे हे देवगिरीवर राहणाऱ्या अजित पवारांच्या हातात आहे, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. तसेच नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा का? असे विचारले असता त्यांच्याकडे नैतिकताच शिल्लक नाही, असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कितीही वेळ होऊ द्या. मृत संतोष देशमुख यांना तुमच्या मनातून जाऊ देऊ नका. ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही आलात. आरोपींना मोक्का लागला पाहिजे, ३०२ मध्ये गेले पाहिजेत. त्यांचा 'तेरे नाम' झाला पाहिजे, सलमान खान सारखी यांची अवस्था झाली पाहिजे. देशमुख यांच्या पत्नीला नोकरी लागली पाहिजे. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करत आहे, असेही धस म्हणाले.