Suresh Dhas News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच आता २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड जबाबदार असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
या प्रकरणात सुरेश धस वाल्मीक कराडबाबत अनेक दावे करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. सुरेश धस यांच्याकडून होत असलेल्या टीकेवरून महायुतीत खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्याशी बोलतील, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला
पंकजा मुंडेंचा लोकसभेच्या पराभवानंतर माझ्याविषयी गैरसमज झाला. पंकजा मुंडे यांची जागा निवडून आली नाही, कारण लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात ९८ हजार मते विरोधात गेली. ही मते कुणामुळे विरोधात गेली? यांच्याच कृपेमुळे आम्ही हरलो. सगळ्यांचे प्रारब्ध आम्ही ठरवू, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. वाल्मीक कराडच्या दादागिरीचा प्रसार आणि प्रचार झाला. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, असा मोठा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्या मैत्रीत दरी
बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचे वाटोळे विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांनी केले. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नसत्या. दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. बजरंग सोनावणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला, असा दावाही सुरेश धस यांनी केला. ते टीव्ही९शी बोलत होते.