मविआच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:44 AM2021-10-15T08:44:47+5:302021-10-15T08:51:56+5:30

महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल असा टोलाही केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

BJP Strongly answer to Shiv sena over criticism in Saamana | मविआच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

मविआच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार महाराष्ट्रातील जनताच मोडेल; भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देदेशात लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य उरलंय का? असा म्हणता, ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच तुम्ही अग्रलेख लिहितायकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही हे वारंवार दाखवून दिलंसामना अग्रेलखाच्या टीकेवरून भाजपाने शिवसेनेला दिलं जशाचं तसं उत्तर

मुंबई – दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा(Shivsena-BJP) यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून वाघ मेंढराच्या कळपात शिरल्यावर जी अवस्था होते तशी भाजपाची झाली आहे असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर शरसंधान साधलं. त्यावर आता भाजपानेही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी ट्विट करुन म्हटलंय की, स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत सामील झाल्यानं हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही हे वारंवार दाखवून दिलं असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच देशात लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य उरलंय का? असा म्हणता, ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच तुम्ही अग्रलेख लिहिताय. तुमच्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांना मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण केली जाते. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होत नाही म्हणून रिक्षाचालकांना मारहाण, दुकानदारांना शिवीगाळ केली जाते. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल असा टोलाही केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

शिवसेनेनं काय म्हटलं होतं?

सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. केंद्रातले भाजपा सरकार आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे? असा सवाल त्यांनी विचारला. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय्य हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱया शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱयांना चिरडून मारणाऱया या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱया प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्यापीठांत मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेडय़ांत जखडून टाकला आहे. अमृत महोत्सव साजरा करण्याचे ढोंग करू नका असं शिवसेनेने म्हटलं होतं.

तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भाजपाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत असा टोला शिवसेनेने लगावला होता.

संबंधित बातमी - “शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरलेल्या मेंढरासारखी भाजपाची अवस्था झालीय”

Web Title: BJP Strongly answer to Shiv sena over criticism in Saamana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app