'...नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल', खड्ड्यांवरून चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 04:19 PM2021-10-03T16:19:40+5:302021-10-03T16:21:32+5:30

Chandrakant Patil : महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे", अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

BJP state president Chandrakant Patil criticizes Shivsena over potholes on roads in Mumbai and Thane | '...नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल', खड्ड्यांवरून चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

'...नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल', खड्ड्यांवरून चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

Next

मुंबई : खड्ड्यांवरून सध्या मुंबई महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले असून खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी भाजपाने साधली आहे. दरम्यान, काल भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केले आहेत. "मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो! डांबरीकरणानंतर केवळ 12 तासांत पुन्हा खड्डे पडले तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे", अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

"गेल्या 24 वर्षांत मुंबई महानगरपालिकेने रस्ते आणि खड्डे यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 21 हजार कोटी खर्च केले आहेत आणि तरीही प्रवाशांचे दरवर्षी तेच हाल होत आहेत. कारण महानगरपालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने जनतेच्या करातून आलेल्या निधीला खड्डा पाडण्याचे काम सुरु आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्यामुळेच मुंबई महानगरपालिका जरी तब्बल 42 हजार खड्डे भरल्याचा दावा करत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे खड्डे भरलेच गेले नाहीत किंवा झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. हिंदमाता पुलावरील खड्डे एका दिवसात जैसे थे होतात, यातून हेच स्पष्ट होते", असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

याचबरोबर, "दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल", असा इशाराही चंद्रकात पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

Web Title: BJP state president Chandrakant Patil criticizes Shivsena over potholes on roads in Mumbai and Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.