भाजपाकडून 'त्या' व्हिडिओचा निषेध, पण जाब विचारणे चुकीचे आणि खोडसाळपणाचे - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 07:41 PM2020-01-21T19:41:59+5:302020-01-21T19:52:07+5:30

'छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही'

bjp state president chandrakant patil comment on modi shah viral video | भाजपाकडून 'त्या' व्हिडिओचा निषेध, पण जाब विचारणे चुकीचे आणि खोडसाळपणाचे - चंद्रकांत पाटील

भाजपाकडून 'त्या' व्हिडिओचा निषेध, पण जाब विचारणे चुकीचे आणि खोडसाळपणाचे - चंद्रकांत पाटील

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे निर्माण झालेला वाद नुकताच शमला आहे. यानंतर आता तान्हाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रूपात दाखविलेला व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून आता वाद सुरू झाला आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडीओचा भाजपाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "तान्हाजी चित्रपटाच्या दृष्यांचा वापर केलेला एक व्हिडीओ पोलिटिकल कीडा नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला. तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजपा या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरुन भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपाची भूमिका आहे."

याचबरोबर, " सोशल मीडियाच्या बाबतीत कोण काही व्हिडिओ बनवून व्हायरल करेल? यावर कोणाचा निर्बंध असू शकत नाही. हा वादग्रस्त व्हिडिओ अशाच प्रकारे कोणीतरी व्हायरल केला. भाजपाच्या बाबतीत संशय निर्माण करून टीका करण्याचा विषय तयार करण्याचा डाव त्यामागे दिसतो,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याशिवाय, "जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना छत्रपतींच्या बाबतीत बोलायचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. ते एक अद्वितीय ऐतिहासिक राजे होते आणि असे कर्तबगार राजे पुन्हा होणे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही", असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, या व्हिडीओवरून छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनीय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, असं ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. 

('पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले)

Web Title: bjp state president chandrakant patil comment on modi shah viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.