राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:01 IST2025-02-17T16:01:19+5:302025-02-17T16:01:43+5:30
योजनांच्या लाभार्थींना भाजपचे सभासद करा

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे
कोल्हापूर : पुढील पंधरा वर्षे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत राहण्यासाठी आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये भाजपचीच सत्ता येण्यासाठी राज्यात १ कोटी ५१ लाख भाजपचे सभासद होणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यातील लाडकी बहीण योजनेचे २ कोटी २० लाख तर मोफत विजेच्या ४० लाख कृषी पंपधारकांना भाजपचे सभासद करून घ्या, असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील संघटन पर्व कार्यशाळेत ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यशाळा झाली.
मंत्री बावनकुळे म्हणाले, राज्यात आतापर्यंत भाजप सदस्य नोंदणीत पश्चिम महाराष्ट्रातील योगदान मोठे आहे. आतापर्यंत राज्यात १ कोटी १६ लाख भाजप सदस्यांची नोंदणी झाली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ५१ लाखापर्यंतचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण आणि मोफत कृषी पंप योजनेतील लाभार्थींनाही सभासद करून घ्यावे. राज्यात भाजपचे अधिकाधिक सभासद झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत १३ हजार जणांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल. राज्यातील सर्व ३६ जिल्हा परिषद आणि २७ महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे.