The BJP-Shiv Sena incomming, people shown their place to the vidhan sabha election 2019 | भाजप-शिवसेनेतील 'या' आयारामांना जनतेनं दाखवली जागा !
भाजप-शिवसेनेतील 'या' आयारामांना जनतेनं दाखवली जागा !

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून अनेक दिग्गज नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले. सत्ताधारी भाजप किंवा शिवसेनेत जावून या नेत्यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे नियोजन केले होते. मात्र यातील अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यातील काही नेत्यांनी असलेल्या पक्षातून विजय निश्चित असताना देखील पक्षांतराचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या पक्षांतराच्या निर्णयाला जनतेने नाकारले आहे.   

उदयनराजेंचा निर्णय फसला
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीचा खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याविरुद्ध राजेंना पराभव पत्करावा लागला. खासदारकीचा पाच वर्षांचा कालावधी असताना उदयनराजे यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यांना साताऱ्यातील जनतेने धक्का दिला.

रश्मी बागल यांचा भ्रमनिरास
राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी सर्वांनाच धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला होता. वास्तविक पाहता करमाळ्यात शिवसेनेचेच आमदार नारायण पाटील 2014 मध्ये विजयी झाले होते. तरी देखील विकासासाठी आपण सेनेत जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांनाच आता शिवसेनेच्या तिकीटावर पराभव पत्करावा लागला.

वैभव पिचडही पराभूत
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत पिचड यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदार संघातून आघाडी मिळवून दिली होती. तरी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. आता मात्र त्यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले.

जयदत्त क्षीरसागर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणूक सहा महिन्यांवर असताना शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने देखील बीडमध्ये पक्ष वाढविण्याच्या उद्देशाने क्षीरसागरांना मंत्रीपद देऊऩ विधानसभेची उमेदवारीही दिली. मात्र पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून जयदत्त यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे क्षीरसागरांचा शिवसेना प्रवेशही फसल्याचे स्पष्ट झाले.

हर्षवर्धन पाटील
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून तिकीट मिळत नसल्याचे पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारी देखील दिली. मात्र तेथून राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्र्यय भरणे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

गोपीचंद पडळकर, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे.

 

Web Title: The BJP-Shiv Sena incomming, people shown their place to the vidhan sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.