"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:19 IST2025-12-05T11:18:34+5:302025-12-05T11:19:52+5:30
येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले.

"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
सिंधुदुर्ग - नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यात शिंदेसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात घेतले जात असल्याने रवींद्र चव्हाण यांच्यावर शिंदेसेनेने आगपाखड केली होती. मात्र आता महायुतीतील वाद मिटवण्यासाठी लवकरच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकत्रित चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांशी संपर्क साधून वादावर पडदा टाकला पाहिजे असं म्हटलं आहे. सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी महायुतीतील वादावर भाष्य केले.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यापैकी काही निवडणुका पूर्ण झाल्यात. काही ठिकाणी अजूनही निवडणुका बाकी आहे. निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात. ते होणं स्वाभाविक असते. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही महायुतीत एकत्रपणे सत्तेत गेली वर्षभरापासून चांगली कामे करतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं त्यांनी सांगितले.
तसेच महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कालच चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी विषय अधिक वाढवू नये असं सांगितले. त्यावर काय करावे असं मी विचारले. त्यामुळे लवकरच आम्ही सर्व जण देवेंद्र फडणवीस, मी आणि ते एकत्रित बसणार आहोत. जे घडलंय त्यावर आपण पडदा टाकला पाहिजे असं शिंदेंनी म्हटलं. त्यामुळे कल्याण डोंबिवली हा जो अतिशय संवेदनशील भाग आहे. त्या भागात काही पक्षप्रवेश झाले. शिवसेनेत काही प्रवेश घेतले, त्यानंतर भाजपानेही प्रवेश घेतले. युवा नेते अभिजीत थरवळ यांच्या पक्षप्रवेशानंतर अधिक तीव्रता जाणवली. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर येथे जे पक्षप्रवेश झाले त्यात दोन्ही बाजूने आक्षेप घेण्यात आले. त्यावर वरिष्ठ मंडळी सर्वजण एकत्र बसण्याचं ठरवलेले आहे. त्यावर १०० टक्के चर्चा होईल अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, तूर्तास या सर्व गोष्टींवर पडदा पडला पाहिजे. यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील सर्व भागात भाजपा आणि शिवसेना यांच्यात आपापसातील नेते पक्षात घेऊ नये असा निर्णय सध्या झाला आहे. लवकरच अधिवेशन काळात कधीतरी एक दिवस एकत्र बसून चर्चा होईल. महाराष्ट्राला येणाऱ्या काळात गतिमान करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जे काही आवश्यक असेल ते करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.