मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 06:24 IST2025-12-28T06:20:39+5:302025-12-28T06:24:06+5:30
पक्षांची रणनीती काय? : ठरलेल्या जागांवर एबी फॉर्म घ्या अन् अर्ज भरा, सगळ्याच राजकीय पक्षांचा नवीन फॉर्म्युला, उमेदवार याद्या गुलदस्त्यातच चित्र आज स्पष्ट होणार : महायुती अन् महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू, कोण कुणासोबत राहणार याचीच उत्सुकता

मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी २०७ जागांवर भाजप व शिंदेसेनेचे एकमत झाले आहे. भाजप १२८ तर शिंदेसेना ७९ असे जागावाटप झाले असून तिढा असलेल्या २० जागांसाठी महायुतीच्या समन्वय समितीची शनिवारी वांद्रेच्या रंगशारदा हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत जागावाटप, उमेदवारांची अदलाबदल आणि प्रचाराच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विधानसभेप्रमाणे १० ते १५ जागांवर उमेदवारांची देवाणघेवाण करून भाजप उमेदवारांना शिंदेसेनेतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, उद्धवसेना व मनसेचे आव्हान असल्याने भाजपचा प्रस्ताव स्वीकारून जागा पदरात पाडणे व युतीतच निवडणूक लढणे हेच पर्याय शिंदेसेनेसमोर आहेत.
आमच्या संयुक्त बैठकीत प्रचाराचे मुद्दे, नेत्यांच्या सभा, जागावाटपाची चर्चा झाली. समोर येणारा उमेदवार कोण व कोणत्या पक्षाचा आहे. तेथील पक्षीय समीकरणे व स्थानिक परिस्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन लवकरच तोडगा निघेल.
आ. अमित साटम, अध्यक्ष, मुंबई भाजप
ज्या जागांवर मतभेद आहेत त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. समन्वय समितीची आणखी एक बैठक होणार असून त्यात निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची चर्चा होऊन तेच योग्य तोडगा काढतील. येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होऊ शकते.
राहुल शेवाळे, नेते, शिंदेसेना
काँग्रेस-वंचितचे अडले
मुंबईसाठी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असली तरी दोन जागांवर मतभेद आहेत. त्यामुळे चर्चा खोळंबली आहे. वंचितकडून काँग्रेसला २० व ५० अशा दोन याद्या देण्यात आल्या होत्या. त्यापैकी २० जागा कोणतीही तडजोड होणार नाही अशा, तर ५० जागा चर्चा होऊ शकते अशा होत्या. २० पैकी १८ वर एकमत झाले, पण २ जागांवरून अडले.
छ. संभाजीनगरमध्ये युतीची बैठक गुंडाळली : छत्रपती संभाजीनगर मनपात प्रत्येकी
४५ जागा लढविण्याच्या मुद्द्यावर भाजप-शिंदेसेनेची शनिवारी पाच तास बैठक झाली. अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
ठाण्यात जागांवरून मतभेद
ठाण्यात शनिवारी तीन तास महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, तीन ते चार प्रभागांवरून म्हणजेच १२ जागांवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम आहेत.
नवी मुंबईतही तेच
नवी मुंबईत भाजपने शिंदेसेनेला २० जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. तथापि, ते शिंदेसेनेला मान्य नसल्याने युती रखडली आहे. दाेन्ही पवारांची चर्चा सुरू आहे.
दोन पवार एकत्र नाहीच, पुण्यात तिरंगी लढती
पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असे चित्र असतानाच राष्ट्रवादी (शरद पवार)चे नेते अंकुश काकडे यांनी हे दोन पक्ष एकत्र येणार नाहीत असे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, आम्ही आमच्या चिन्हावर लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावर लढा असे आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो; पण त्यांना ते मान्य नव्हते. आपण महाविकास आघाडीसोबतच (काँग्रेस, उद्धवसेना) लढले पाहिजे असा सुप्रिया सुळे यांचा आग्रह आहे, त्यानुसार चर्चा सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की, घड्याळावरच दोन्ही पक्षांनी लढावे असा अजित पवारांच्या नेत्यांनी दिलेला प्रस्ताव शरद पवार यांच्या पक्षाने फेटाळल्याने आघाडी होऊ शकली नाही.
हातात बेड्या असलेल्या
बंडू आंदेकरने उमेदवारी अर्ज भरला, पण अर्धवटच..!
पुणे : हातात बेड्या असलेल्या स्थितीत कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर घोषणा देत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला गेला खरा; मात्र अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरूनच घेतला नाही.