bjp-sena alliance will win Maharashtra, but lesser seats than 2014 | महाराष्ट्रात महायुतीचाच वरचष्मा, मात्र २०१४ पेक्षा जागा कमी होणार
महाराष्ट्रात महायुतीचाच वरचष्मा, मात्र २०१४ पेक्षा जागा कमी होणार

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांचा सर्वसाधारण कौल भाजप-शिवसेना महायुतीला राहील. मात्र, २०१४च्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा काही प्रमाणात वाढतील, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) वर्तविला आहे.


२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३, शिवसेनेने १८, राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या होत्या. एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी जिंकली होती. या वेळी ते महाआघाडीसोबत होते. आजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे संख्याबळ निश्चितपणे वाढेल, पण ते युतीपासून फारच दूर असेल. दोन आकड्यांमध्ये जागा मिळविण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न हे स्वप्नच राहील, असे दिसते. राज्यात चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होत असताना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळताना दिसणे, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासादायक ठरू शकेल.


बहुतेक मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळतील आणि त्या खालोखाल शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेवटी काँग्रेसचा क्रमांक असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त फटका बसेल, असे दिसते. वेगवेगळ्या दाव्यांनुसार राष्ट्रवादीला राज्यात १ ते ९ जागा मिळण्याची शक्यता दिसते. तर गेल्या वेळी विदर्भातील दहाच्या दहा जागा जिंकणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला या वेळी काही ठिकाणी धक्के बसतील. दोन ते सहा जागा या ठिकाणी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या खात्यात जाताना दिसत आहेत. मराठवाड्यात आठपैकी सहा जागा युतीने गेल्यावेळी जिंकल्या होत्या. यावेळी दोन ते चार जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळतील, असा अंदाज र्वतविण्यात आला आहे.


अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला एकाही एक्झिट पोलने जागा दिलेली नाही. स्वत: आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर मतदारसंघात लढले. भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम यांची ही आघाडी होती. या आघाडीत एमआयएमने एकमेव औरंगाबादची जागा लढविली पण एक्झिट पोलने एमआयएमलादेखील कौल दिलेला नाही. मायावती यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पार्टीनेही राज्यात सर्वच जागा लढविल्या होत्या पण त्यांच्या खात्यात याहीवेळा भोपळाच येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


Web Title: bjp-sena alliance will win Maharashtra, but lesser seats than 2014
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.