भाजपा उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30

आगामी मुंबई महापालिका स्वबळावर जिंकण्याचे स्वप्न बाळगणारी भाजपा मुंबईत उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात आहे.

BJP seeks North Indian face | भाजपा उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात

भाजपा उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात

गौरीशंकर घाळे,

मुंबई- आगामी मुंबई महापालिका स्वबळावर जिंकण्याचे स्वप्न बाळगणारी भाजपा मुंबईत उत्तर भारतीय चेहऱ्याच्या शोधात आहे. आजघडीस उत्तर भारतीय मतदारांना जवळचा वाटेल असा लोकप्रिय आणि सक्षम नेता पक्षाकडे नसल्याने काँग्रेसमधून नेता आयात करण्यासाठी भाजपा चाचपणी करत आहे.
महापालिका निवडणुकीत मराठी मते शिवसेनेकडे वळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपा आपल्याविषयी सहानुभूती असलेला मराठी मतदार राखून जास्तीतजास्त अमराठी मतेही खेचण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईतील अमराठी मतदारांमध्ये प्रामुख्याने गुजराती आणि उत्तर भारतीयांचा भरणा आहे. त्यापैकी गुजराती मतांबाबत भाजापा काहीसा निर्धास्त आहे. मंत्री प्रकाश मेहता, आमदार योगेश सागर यांच्यासह अनेक सक्षम नेते भाजपाकडे आहेत. उत्तर भारतीय मतदारांना स्वत:कडे खेचण्यासाठी मात्र भाजपाला कसरत करावी लागणार आहे.
उत्तर भारतीय मतदारांना आपलासा वाटेल आणि महापालिका निवडणुकीत प्रभावी ठरेल असा नेता भाजपाकडे नाही. राज्यमंत्री विद्या ठाकूर, जयप्रकाश ठाकूर, आर. यू. सिंह, अमरजीत मिश्र, संजय पांडेय, विवेकानंद गुप्ता, आर. डी. यादव, संजय उपाध्याय, ओमप्रकाश चौहान, अमरजीत सिंह आदी नेत्यांच्या जोरावर महापालिकेचे शिवधनुष्य पेलणे अवघड असल्याची जाणीव भाजपाला आहे. शिवसेनेतून भाजपात आलेल्या प्रेम शुक्लांना मुंबईतील नेते स्वीकारण्यास फारसे उत्सुक नाहीत.
सिंह यांच्याविषयी नाराजी
अलीकडेच भाजपात दाखल झालेल्या आर. एन. सिंह यांना भाजपाने विधान परिषदेची आमदारकी दिली. गेली २० वर्षे आर. एन. सिंह उत्तर भारतीय संघाचे अध्यक्षपद सांभाळत असले तरी त्यांच्यामागे पुरेसा जनाधार नाही. उत्तर भारतीय संघातील त्यांच्या एकाधिकारशाहीमुळे असलेली नाराजी उघड झाली आहे. शिवाय, त्यांना आयत्यावेळी उमेदवारी मिळाल्याने पक्षातील जुने उत्तर भारतीय नेते, पदाधिका-यांच्यामध्ये नाराजी आहे. त्यामुळे सिंह यांच्या उमेदवारीचा महापालिका निवडणुकीसाठी लाभ मिळणार नाही.

Web Title: BJP seeks North Indian face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.