BJP responsible for ban on PMC Bank, Ajit Pawar accused on government | PMC बँकेवरील निर्बंधाला भाजपाच जबाबदार, अजित पवारांचा आरोप

PMC बँकेवरील निर्बंधाला भाजपाच जबाबदार, अजित पवारांचा आरोप

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.  बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील नियम 35 अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या बँकेच्या डबघाईलाच भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. 

पीएमसी बँकांच्या सर्वच शाखांचे आज सकाळपासून व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. दरम्यान, हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल, असे स्पष्ट केले आहे. या बँकेवरील निर्बंधानंतर अजित पवार यांनी भाजपा सरकारवर आरोप केले आहेत. 

देशाच्या बिकट अर्थव्यवस्थेमुळे बँकांना व्यवहार हाताळणं अवघड बनलंय. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक गर्तेत सापडलीय. रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेत. पुढचे 6 महिने ठेवीदारांना नाहक त्रास होणार आहे. भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळेच बँका डबघाईला आल्यात, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP responsible for ban on PMC Bank, Ajit Pawar accused on government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.