"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:41 IST2025-09-16T08:37:57+5:302025-09-16T10:41:54+5:30
आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता? असा सवाल भाजपाने शरद पवारांना विचारला आहे.

"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
मुंबई - शरद पवार कृषी मंत्री असताना ५५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वेगळ्या शब्दात मांडायचं तर, पवार यांच्या ५० वर्षाच्या राजकीय आयुष्यात रोज सरासरी ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्यांच्या कारकिर्दीचा दिवस शेतकरी आत्महत्येविना सरला नाही त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही? अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
नाशिकच्या शेतकरी मोर्च्यात शरद पवारांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देत भाजपाने म्हटलं की, शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करतायत, पण इतिहासात डोकावलं तर तुमच्या सत्तेच्या काळात केलेल्या हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारताना दिसतील. आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता? असा सवाल करत शेतकरी कर्जमाफी केल्याचा डांगोरा पिटत प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाबाजी का ठुल्ला देत बॅंकांची भरपाई पवारांनी केली असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.
तसेच स्वामीनाथन समितीचा अहवाल सोयीस्कर शरद पवारांनी दाबला. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला तर त्यांच्या मागण्यांवर बोलण्याऐवजी त्यांच्या नेत्यांची जात पवारांनी काढली. कांद्याचे भाव कधी वाढतील या प्रश्नाचे उत्तर देताना ‘मी ज्योतिषी नाही’ असंही पवारांनी म्हटलं होते. लवासासाठी हजारो एकर शेती घेताना ज्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला ते शरद पवारच होते. सगळ्याच प्रश्नांची सुरुवातच इथे झाली आणि उत्तरेही इथेच येऊन थांबतात. शेतकरी प्रेमाची कितीही सरकारविरोधी भाषणे करा मात्र आपल्या इतिहासाचा हाच भयाण वास्तव चेहरा आहे. किती उगाळायचा इतिहास, उगाळेल तेवढा काळाच असा घणाघात भाजपाने शरद पवारांवर केला आहे.
शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करतायत, पण इतिहासात डोकावलं तर तुमच्या सत्तेच्या काळात केलेल्या हजारो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारताना दिसतील… आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 16, 2025
▪️हेच पवार…
काय म्हणाले होते शरद पवार?
नाशिकच्या सभेत बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. देवाभाऊ, सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले. शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहात, हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राजे होते. त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडं नांगराचीही व्यवस्था नव्हती. तेव्हा शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ बसवण्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याच्या फाळाने त्यांनी शेतीची नांगरणी केली. बळीराजा उपाशी राहिला तर देश उध्वस्त होईल असंही महाराज म्हणाले. हा आदर्श शिवाजी महाराजांचा आज देवाभाऊ घेतील, असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठीमोठी होर्डिंग, मोठेमोठे पोस्टर्स, मोठीमोठी चित्र त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लावली, पण त्या बळीराजाच्यासाठी ढुंकवून बघायला तयार नाहीत. असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल असं पवारांनी म्हटलं होते.