Maharashtra Politics: “जशा निवडणुका जवळ येतील, तसे ठाकरे गटातील नेते भाजप-शिंदे गटात येताना दिसतील”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:59 IST2023-02-02T15:58:19+5:302023-02-02T15:59:00+5:30
Maharashtra Politics: महाविकास आघाडी आपल्याला तारू शकत नाही, अशी भावना ठाकरे गटातील अनेक नेत्यांची आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: “जशा निवडणुका जवळ येतील, तसे ठाकरे गटातील नेते भाजप-शिंदे गटात येताना दिसतील”
Maharashtra Politics: आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप आणि शिंदे गट मिळून लोकसभा तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. दुसरीकडे, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील, तसे ठाकरे गटातील अनेक नेते भाजप आणि शिंदे गटात आलेले दिसतील, असा दावा भाजप नेत्याने केला आहे.
भाजप नेते राम शिंदे यांनी हा दावा केला आहे. ठाकरे गटातील अनेक नेते भाजप आणि शिंदे गटात येण्यास उत्सुक आहेत. काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावाही राम शिंदे यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे लोक आपल्या पक्षाच्या संपर्कात असून जसजशी निवडणूक जवळ येईल तसे अनेक लोक त्यांना सोडून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामध्ये दिसतील, असा दावा भाजप प्रवक्ते आणि आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे नेते सत्तेविना राहू शकत नाहीत
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांच्या नेत्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू आहे, ते सत्तेविना राहू शकत नाहीत. त्यांना कशीबशी सत्ता मिळाली होती. पण, तीही आता गेली आहे, अशी टीका करत राम शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार जून महिन्यापासून अतिशय चांगले काम करत आहे, असे राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी आपल्याला तारू शकत नाही, अशी भावना ठाकरे गटातील अनेक नेत्यांची आहे. म्हणूनच त्यांची चलबिचल सुरू आहे, असा दावाही राम शिंदे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"