उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे...; नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 15:18 IST2023-04-29T15:18:01+5:302023-04-29T15:18:56+5:30
Nitesh Rane News: वडील आजारी असताना आदित्य ठाकरे हे वरुण सरदेसाईंना घेऊन दावोसला मजा मारत होते, अशी टीका करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे...; नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ
Nitesh Rane News: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यातच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना जसलोकमध्ये काय घडले, उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई दावोसला मजा मारायला गेले होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना इकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठकाही घेतल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला म्हणून आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले, असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
आधी राजन साळवी यांचे मन वळवा मग पुढच्या गप्पा मारा
७० टक्के लोक रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने आहेत असे सांगायला तुम्ही काय सर्व्हे केला होता काय? असा सवाल संजय राऊत यांनी राज्य सरकारला विचारला होता. त्यालाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारने सर्व्हे केला नव्हता तर प्रकल्पाच्या विरोधात लोक आहेत हे पाहण्यासाठी संजय राऊतांनी तरी सर्व्हे केला होता काय? असा उलट प्रश्न नितेश राणे यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांचा आदेश त्यांचा शिपाईही मानत नाही. बारसूतील लोक या मानणार? आधी राजन साळवी यांचे मन वळवा मग पुढच्या गप्पा मारा. जो विषय राजन साळवी यांना समजतो तो उद्धव ठाकरे यांना का कळत नाही? असा सवाल नितेश राणेंनी केला.
दरम्यान, नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांची नक्कल करून दाखवली. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली. जेलमध्ये टाकण्यात आले, असा आरोपही नितेश राणे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"