नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:43 IST2025-07-01T10:45:32+5:302025-07-01T11:43:57+5:30

गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

BJP Narayan Rane attacks Uddhav Thackeray; "Uddhav harassed Raj Thackeray | नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 

मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे ५ जुलैला मोर्चा काढणार होते त्याआधीच सरकारने त्यांचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता या मोर्चाऐवजी विजयी मेळावा साजरा केला जाणार आहे. राज आणि उद्धव यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे चिन्हे दिसत आहेत त्यातच एकेकाळी शिवसेनेत असणारे भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे.

नारायण राणे यांनी फेसबुक पोस्ट करत शिवसेनेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. परंतु मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

तसेच राज ठाकरे, मी, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले यांनी ती सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी यांना घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

५ जुलैला विजयी मेळावा, ठाकरे बंधू एकत्र येणार

राज्यात हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे यांनी मराठी भाषा प्रेमींना आवाहन करत मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवत मराठी यावर एकत्र यावे असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध करत राज यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वात ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा आयोजित केला होता. परंतु राज्य सरकारने या मोर्चाच्या आधीच हिंदीबाबत काढलेले २ जीआर रद्द केले. त्यामुळे हा मोर्चा रद्द करावा लागला. परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयाने मराठी भाषिकांचा विजय झाला हे सांगत ५ जुलैच्या मोर्चाचे रुपांतर विजयी मेळाव्यात केले जात आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. 

Web Title: BJP Narayan Rane attacks Uddhav Thackeray; "Uddhav harassed Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.