BJP MP Nitesh Rane News: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निकालांनी अनेकांना धक्के बसले. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेली महाविकास आघाडी भुईसपाट झाली, तर लोकसभेला निराशाजनक कामगिरी झालेल्या महायुतीने विधानसभेत जोरदार कमबॅक करत ऐतिहासिक विजय मिळवला. या गोष्टीला आता काही महिने उलटून गेले असले तरी विरोधक मात्र ईव्हीएम मशीनचा मुद्दा घेऊन टीका करताना पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत विरोधकांनी ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली.
लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरुन निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून? आम्ही मागील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा सविस्तर अभ्यास केला आहे. या निवडणुकीत काहीतरी गोंधळ नक्कीच झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली. या टीकेला आता महायुतीतील नेते प्रत्युत्तर देत असून, भाजपा खासदार नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना पलटवार केला.
दिल्लीत थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, यांची विश्वासार्हता काय?
पत्रकारांशी बोलताना खासदार नितेश राणे म्हणाले की, मी ऐकले आहे की, थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाली. त्या तीनमधील दोन जण तर ईव्हीएमवर निवडून आले आहे. राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवरच मते मिळवून विजय मिळवला आहे. तर संजय राऊत हे आमदारांच्या आशीर्वादाने बॅक डोअरमधून राज्यसभेवर गेले आहेत. या तिघांची विश्वासार्हता काय आहे? तिघांमध्ये दोघे ईव्हीएमवर निवडून आले असतील तर मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत, लोकसभा निकालानंतर आम्ही रडत बसलो नाही. आम्ही कामाला लागलो. त्यामुळे हरियाणा, महाराष्ट्रात आम्ही सत्ता आणून दाखवली, आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला, असे नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांचे जे निवडून आलेले खासदार आहे, त्यांनी राजीनामे द्यावे आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडून यावे. मग बघावे की, त्यांच्यासमोर खासदार लागते की माजी खासदार लागते. यांचे दुःख एवढेच आहे की, महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेले आहे. आमच्या काही उमेदवारांना ६, १५ अशी मते मिळाली आहे. मग तिथे आम्ही तक्रार केली का? स्वतः ईव्हीएमच्या नावावर निवडून यायचे आणि मग रडत बसायचे. त्यापेक्षा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे लोकांची कामे करा, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.