Manoj Jarange Latest news: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली. त्यांच्या आईचा अपमान केल्याचे सांगत भाजपच्या नेत्यांनी जरांगेंवर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही", असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला. तर आमदार प्रवीण दरेकर यांनीही शरद पवारांचं नाव घेत जरांगेंवर निशाणा साधला.
आमदार प्रसाद लाड म्हणाले, "मनोज जरांगे पाटील, हा माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठी आरक्षणाची गोष्ट करत आहात. त्या छत्रपतींनी आपल्याला आयाबहिणींची इज्जत कशी करावी, सन्मान कसा करावा हे शिकवलं."
हे कदापि सहन करणार नाही -जरांगे
"त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करत आहात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही", असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.
शरद पवारांचं नाव घेत जरांगेंवर हल्ला
"एवढीच जर तुम्हाला खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढी वर्षे आरक्षण दिलं नाही, त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही. तुम्हाला निवडणुका आल्या की, राजकीय भांडवल फुगतं आणि आरक्षणाची तुमची नौटंकी सुरू होते. जर तु्म्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात, तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला कमी करणार नाही. हा माझा तुम्हाला इशारा आहे, हे समजून चला", असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.
"पवारांच्या पालख्या वाहायच्या आणि फडणवीसांच्या आईला शिव्या"
"सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने, कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर...", असा संताप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
"व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही. शरद पवारांचं कौतुक करायचं, गुणगान गायचं. पालख्या वाहायच्या आणि दुसऱ्या बाजूला आईवरून शिव्या द्यायच्या, हे कुठलं धोरण?", असा सवाल प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना केला आहे.
मी शिवी दिली नाही -मनोज जरांगे
दरम्यान, मनोज जरांगे यांना याबद्दल विचारण्यात आले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "मी शिवी दिली नाही. जर दिली गेली असेल, तर शब्द मागे घेतो."