BJP minister political attack on Priyanka Gandhi | प्रियांका गांधी म्हणजे फसव्या व्यक्तीच्या पत्नी; भाजप मंत्र्याची जीभ घसरली
प्रियांका गांधी म्हणजे फसव्या व्यक्तीच्या पत्नी; भाजप मंत्र्याची जीभ घसरली

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे ग्रामविकास राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांची जीभ घसरली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना शुक्ला यांचा तोल सुटला आणि प्रियंका गांधी ह्या एका फसव्या व्यक्तीची पत्नी असल्याचे ते म्हणाले. सोमवारी राज्यमंत्री शुक्ला यांनी बलिया जिल्ह्यातील राजागाव खारौनी येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना शुक्ला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आम्ही प्रियांका गांधी यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी गरिबांच्या जमिनी बळकावल्या आहेत. प्रियांका यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर सुटलेल्या त्यांचे पती, भाऊ आणि आईबद्दल आधी बोलायला पाहिजे. तर याचवेळी प्रियंका गांधी यांच्यावर आरोप करताना शुक्ला यांची जीभ घसरली. प्रियंका गांधी ह्या एका फसव्या व्यक्तीची पत्नी असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलताना शुक्ला म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा ही देशाला कमकुवत करणारी आहे. तसेच काँग्रेस हा पाकिस्तान धार्जिणे पक्ष आहे. देशाचे तुकडे करणाऱ्या टोळीसोबत काँग्रेस उभा राहते. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे पाकिस्तानी लोकांना रोल मॉडेल समजतात असेही शुक्ला म्हणाले.

त्यांनी यावेळी गांधी कुटुंब आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानला मानणारा काँग्रेस पक्ष कलम 370 हटवण्यास विरोध करत होता. त्यांचे होर्डींग पाकिस्तानमध्ये लागतात. तर प्रियंका गांधी ह्या एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी असून त्यांचे विचार सुद्धा फसवे असल्याचे सुद्धा शुक्ला म्हणाले.

Web Title: BJP minister political attack on Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.