BJP Ashish Shelar News:उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसाची एकजूट ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले, तेव्हाही सभागृह दणाणून गेले. कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले, पण तशी घोषणा करण्यात आली नाही. यानंतर या मेळाव्याबाबत राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, भाजपा महायुतीकडून टीका केली जात आहे.
दोन भाऊ एकत्र झाले खूप छान झाले. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे, कारण हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचे महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचेच झाले तर, एकाचे भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचे भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.
कोणीही द्वेषाची भावना पसरवू नये
ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात ज्यांच्याकडे प्रभावी मांडणी नसते ते विपर्यासाकडे जातात ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात. कोणीही द्वेषाची भावना पसरवू नये आणि महाराष्ट्रात कायदेशीर राहणाऱ्या कोणीही घाबरण्याचे कारण नाही. मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपानेच केली आणि भाजपाच करेल. अमराठी माणसाने सुद्धा मराठी माणसाला डिवचू नये पण म्हणून कुठेही घाबरण्याचे कारण नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच तुमच्या लेकरांनी तीन भाषा शिकाव्यात महाराष्ट्रातल्या अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये?, असा सवालही आशिष शेलार यांनी केला.
खरे तर दोन घटनेची तुलना करता येत नाही पण या सगळ्या गोष्टीची मला उद्विग्नता येते. पहेलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपता आहेत. हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय! इंग्रजांची रणनीती होती तोडा आणि राज्य करा. आता काही पक्षांची रणनीती आहे भीती पसरवा आणि स्वतःची मत मिळवा, अशी टीकाही त्यांनी केली.
आव मराठीचा आणि घाव मुंबईच्या अर्थसंकल्पावर....!
जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धव ठाकरे भाजपासोबत आले आणि केंद्रापासून महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धव ठाकरेंना सरकार त्या ठिकाणी मिळाले. सरकारमध्ये सहभाग मिळाला. आता त्यानंतर सत्तेतील, राज्यातील मुख्यमंत्रीपदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत ते गेले. राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवले आणि आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेला कुरवळायचे काम चालू आहे, या शब्दांत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, स्वतः पंढरपूरला वारीत सहभागी होऊन आलो. म्हणून सुरुवातीलाच समस्त नागरिकांना आणि महाराष्ट्राला आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना देतो. स्वच्छतेच्या बाबतीत असेल, दर्शनाच्या बाबतीत असेल, वाहतुकीच्या व्यवस्थांच्या बाबतीत असेल, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये यावेळेची वारी आणि व्यवस्था आदर्शवत वाटाव्यात अशा पद्धतीच्या व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केल्या असून सरकारला मनापासून धन्यवाद देतो, असे ते म्हणाले.