'गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांनाचा उपचाराची गरज', नाना पटोलेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:34 IST2022-01-24T17:34:21+5:302022-01-24T17:34:51+5:30
Nana Patole News: राज्यातील भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक समजेनासा झाला आहे. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

'गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांनाचा उपचाराची गरज', नाना पटोलेंचा पलटवार
मुंबई - आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाही, तर एका गावगुंडाबद्दल बोललो होतो हे आधीच स्पष्ट केल्यानंतरही राज्यातील भाजपचे नेते एका गावगुंडाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध जोडून त्यांची बदनामी करत आहेत. राज्यातील भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक समजेनासा झाला आहे. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, मी एका गावगुंडाबद्दल बोललो होतो, त्या गावगुंडाने प्रसार माध्यमासमोर येऊन सर्व सांगितले आहे तसेच तो गावगुंड जे बोलला ते मी माध्यमांना सांगितले. मी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कोणताही अपशब्द वापरलेला नाही त्यामुळे हे थांबवा असे मी म्हणालो, तरीही भाजपा माझ्याविरोधात आंदोलन करुन पुतळे जाळत आहे. भाजपा त्या गावगुंडाचे समर्थन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्याचा संबंध जोडून त्यांना बदनाम करण्याची मोहीम चालवत आहे.
भाजपाला माझे पुतळे जाळायचे असतील तर त्यांनी खुशाल जाळावेत पण भारत माता की जय म्हणून जे लोक देश विकत आहेत त्यांचे पुतळे जाळा, बेटी बचाव, बेटी पटाव, म्हणणाऱ्यांचे पुतळे जाळा, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणाऱ्यांचे पुतळे जाळा. देशात आज अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्यांबरोबर बेरोजगारांच्या आत्महत्याही वाढत आहेत. ज्यांच्यामुळे देशाची अधोगती सुरु आहे त्यांचे पुतळे त्यांनी जाळावेत.
पंतप्रधानपदाचा मान, सन्मान, प्रतिष्ठा याची काँग्रेसला जाणीव आहे, त्या पदाचा अवमान करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही परंतु भाजपाचे नेतेच डॉ. मनमोहनसिंह पंतप्रधानपदावर असताना कोणत्या भाषेत बोलत होते ते सर्वांना माहित आहे. स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणणाऱ्या भाजपाचा सुसंस्कृतपणा त्यावेळी कुठे गेला होता. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य आणि माझे वक्तव्य हे दोन्ही विषय वेगळे आहेत. त्याची तुलना भाजपाने करु नये, असेही नाना पटोले म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, माझे मानसिक संतुल बिघडले आहे असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेच खरेतर मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने भाजपाला धुळ चारली आहे. भाजपाचा आम्ही पराभव केला आहे, त्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे, या धक्क्यातून ते सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक कळत नाही त्यांना उपचाराची जास्त गरज आहे असा टोला नाना पटोलेंनी लगावला.