Maharashtra Politics: “विचारधारा अन् पात्रता नाही”; दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा विरोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 13:47 IST2022-11-13T13:46:39+5:302022-11-13T13:47:28+5:30
Maharashtra News: पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात प्रवेश देता कामा नये, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

Maharashtra Politics: “विचारधारा अन् पात्रता नाही”; दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा विरोध!
Maharashtra Politics: शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, युतीत असलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांनी दीपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध दर्शवला असून, दीपाली सय्यद यांना शिंदे गटात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे.
दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करताच भाजपमधील काही नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका केली होती. त्यामुळे आधी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपची माफी मागावी. त्यानंतरच दीपाली सय्यद यांना शिंदे गटात प्रवेश दिला जावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी केली आहे.
भाजपवर टीका करणाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश देऊच नये
दीपाली सय्यद यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत. कोणतीही विचारधारा नसलेल्या, आपली मते सातत्याने बदलणाऱ्या तसेच कुठलीही पात्रता नसलेल्या दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. आमच्या दोन्ही नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या दीपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात प्रवेश देताच कामा नये, अशी भूमिका पेंडसे यांनी घेतली आहे.
दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्याचे घोषित करताना दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला होता. संजय राऊत यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेते दोन गट पडले. शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत शिंदे साहेबांसोबत उभे राहणे, हे माझे कर्तव्य असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"