चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 08:06 IST2025-12-14T08:05:47+5:302025-12-14T08:06:26+5:30
मुंबईहून निघालेल्या या चार्टर्ड प्लेनमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सुमित वानखेडे आणि चित्रा वाघ तसेच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन होते.

चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
नागपूर : देशातील विमानसेवा विस्कळीत झालेली असताना नागपूरला विधिमंडळ अधिवेशनासाठी चार्टर्ड प्लेनने आलेल्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांकडून शब्दांचे चांगलेच फटके लावण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मुंबईहून निघालेल्या या चार्टर्ड प्लेनमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सुमित वानखेडे आणि चित्रा वाघ तसेच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन होते. या नेत्यांनी विमानात घेतलेला सेल्फी त्यांच्यापैकी एकाने व्हायरल केला, पण त्याचे चटके सगळ्यांनाच सहन करावे लागले, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. समाजमाध्यमांत या चार्टर्ड प्लेन प्रवासावर टीकेची अक्षरशः झोड उठवली. इंडिगोसह इतर विमानांची सेवा त्यावेळी पूर्णतः विस्कळीत झाली होती आणि त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला आणि त्याचवेळी भाजप नेत्यांच्या या सेल्फीमुळे संताप व्यक्त करण्यात आला होता.
काँग्रेसचे सतेज पाटील यांनी अधिवेशनानंतर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी विधान परिषदेत अलीकडेच केली. 'सगळ्यांना चार्टर्ड विमानाने जाणे शक्य नसते' असा चिमटा त्यांनी आ. लाड यांचे नाव घेत काढला होता. भपकेबाजपणा टाळून वावरा, असे केंद्रीय भाजपकडून महाराष्ट्रातील नेत्यांना बजावण्यात आले आहे. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याबाबतची सक्त ताकीद देण्यात आली आहे. निवडणुकीत पैशाची उधळपट्टी करू नका, आपल्याला पैशाची मस्ती आली आहे असे कुठेही जाणवता कामा नये, असा दम देण्यात आला आहे.
शाह यांनी माहिती मागवली
१. भाजपचे संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी हा फोटो महाराष्ट्रातील भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांना मोबाइलवर पाठविला आणि त्याबद्दल जाबदेखील विचारला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयातूनही या विमान प्रवासाबाबत माहिती मागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील शीर्षस्थ नेतृत्वाला या प्रकाराची गंभीर दखल घेणे भाग पडले.
२. आपल्या अशा कृतीने पक्षाची प्रतिमा मलिन होते याचे भान ठेवणे आवश्यक होते, असे खडे बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. त्यानंतर ज्याने फोटो समाजमाध्यमांवर टाकला त्याने पुन्हा चूक होणार नाही, अशा शब्दांत माफी मागितली. तसेच फोटो डिलिट केला.