देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 04:13 PM2019-12-12T16:13:39+5:302019-12-12T16:22:46+5:30

पंकजा मुंडेंकडून संघर्षाची हाक राज्य नेतृत्त्वावर हल्लाबोल

bjp leader pankaja munde indirectly hits out at devendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले; पंकजां मुंडेंनी कान टोचले

googlenewsNext

बीड: गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून काहीशा दूर असणाऱ्या भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी अखेर त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्त्वावर वारंवार शरसंधान साधलं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटपर्यंत झटले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत भाजपाचा एकेक आमदार निवडून येईल यासाठी प्रचार केला, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातून पंकजांनी समर्थकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण करुन दिली. निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरलेला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करत होते. एकेक आमदार पक्षाला देण्यासाठी वणवण फिरत होते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

पंकजा मुंडेंच्या नाराजीमुळे त्या पक्ष सोडतील, अशी चर्चा होती. मात्र आपण पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्षावर कोणाचीही मालकी नसल्याचं म्हणत राज्य नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष टीका केली. पक्ष ही प्रक्रिया असते. पक्षावर कुणाचीही मालकी नसते. अटलजी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि आता अमित शहा यांच्यासारख्यांनी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा वाहिली आहे. पक्ष हा कोणाही एका व्यक्तीचा नाही, अशा शब्दांमध्ये पंकजांनी आक्रमक भाषण केलं.  

पंकजा मुंडे बंडखोरी करुन वेगळा मार्ग धरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यावरही पंकजांनी भाष्य केलं. मी का बंड करेन, मी कुणाविरुद्ध बंड करू, असे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. पद मिळवण्यासाठी पंकजा मुंडे दबाव आणत आहेत, असं बोललं जातं. मला पद मिळू नये त्यासाठी अशा चर्चा घडवून काही कारस्थान रचलं जात आहे का, असा प्रश्न मला पडतो, असंदेखील त्या म्हणाल्या. 

आपण कमजोर व्हायचं नाही, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मी प्रत्येक क्षणी सेवा केली. पराभव झाल्यानंतरही प्रत्येक बैठकीला उपस्थित राहिले. सत्तास्थापनेसाठी जे काही करता येईल ते केलं, असं पंकजा म्हणाल्या. एक मैं ही हूं, समझी नहीं खुद को आज तक, एक दुनिया ही है, की न जाने मुझे क्या क्या समझ रही है, असा शेर म्हणत त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य केलं. 
 

Web Title: bjp leader pankaja munde indirectly hits out at devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.