नाराज झालेल्या एकनाथ खडसेंना फडणवीसांचा सल्ला; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 21:53 IST2019-12-13T21:51:34+5:302019-12-13T21:53:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस खडसेंच्या निशाण्यावर

नाराज झालेल्या एकनाथ खडसेंना फडणवीसांचा सल्ला; म्हणाले...
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपा नेते एकनाथ खडसे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मनातील खदखद वारंवार बोलून दाखवत आहेत. काल बीडमधील परळीत गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. त्यावर आज फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना फडणवीसांनी खडसेंना प्रेमाचा सल्लादेखील दिला.
एकनाथ खडसेंना तिकीट नाकारण्याचा निर्णय दिल्लीतून झाला. त्यांचं तिकीट का कापण्यात आलं, याबद्दल मला कल्पना नाही. केंद्रीय नेतृत्त्वच त्यांना यामागील कारणं सांगू शकतं. त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं. एकनाथ खडसेंसोबत मी अनेक वर्ष कामं केलं आहे. मात्र काल त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, तसं ते बोलले नसते तर बरं झालं असतं. कारण तो कार्यक्रम आणि ते व्यासपीठ त्या प्रकारचं नव्हतं, अशा शब्दांत फडणवीसांनी खडसेंच्या भाषणाबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपात नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. जिंकल्यावर जसे हार मिळतात. तसंच पराभव झाल्यानंतर चार शिव्याही खाव्या लागतात. तुम्ही जिंकता तेव्हा सगळं गौण असतं, असं ते पुढे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सातत्यानं फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत आहेत. त्यावरुन फडणवीसांनी खडसेंना प्रेमाचा सल्ला दिला. खडसेंसोबत अनेक वर्षं काम केल्यानं मी त्यांना अगदी जवळून ओळखतो. अनेकदा त्यांच्या मनात काहीच नसतं. मात्र बोलताना ते बोलून जातात. यामुळे त्यांचं बऱ्याचदा राजकीय आणि वैयक्तिक नुकसान होतं. या गोष्टी लक्षात ठेवल्यास आणि त्यानुसार काळजी घेतल्यास त्यांना फायदा होईल, असा सल्ला फडणवीसांनी दिला.