"ठाकरे सरकारने कोहळा नेऊन आवळा दिला" जाहीर केलेल्या मदतीवरून भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 18:04 IST2020-06-07T18:03:18+5:302020-06-07T18:04:34+5:30
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

"ठाकरे सरकारने कोहळा नेऊन आवळा दिला" जाहीर केलेल्या मदतीवरून भाजपाची टीका
सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज राज्य सरकारने अनुक्रमे ७५ आणि २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. मात्र या मदतीवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने दोनशे कोटींचा कोहळा घेत २५ कोटींचा आवळा दिला, असा आरोप भाजपा नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या मदतीवर टीका करताना प्रमोद जठार म्हणाले की, "ठाकरे सरकारने सिंधुदुर्गाचे हक्काचे २०० कोटी रुपये माघारी नेले आहेत. यातील १०० कोटी रुपये चांदा ते बांदा योजनेचे होते. तर १०० कोटी रुपये जिल्हा नियोजनाचे होते. हा २०० कोटी रुपयांचा कोहळा काढून घेत ठाकरे सरकारने २५ कोटींचा कोहला सिंधुदुर्गवासियांच्या हाती दिला आहे. ही मदत तुटपुंजी आहे. या तुटपुंज्या मदतीने काही होणार नाही. त्यापेक्षा जिल्ह्याचे नेलेले दोनशे कोटी रुपये परत द्या, अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले होते. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले. अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.