सावज टप्प्यात आलंय, आता सोडणार नाही; जयकुमार गोरेंचा रामराजेंना अप्रत्यक्ष इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:45 IST2025-03-24T07:45:01+5:302025-03-24T07:45:50+5:30
मी कोणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादाला लागल्यास तर सोडत नाही, असा सूचक इशारा गोरे यांनी दिला आहे.

सावज टप्प्यात आलंय, आता सोडणार नाही; जयकुमार गोरेंचा रामराजेंना अप्रत्यक्ष इशारा
BJP Jaykumar Gore: भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस आणखीनच टोकदार होत आहे. विविध आरोपांमुळे कोंडी झाल्यानंतर आता जयकुमार गोरेंनी नाव न घेता रामराजेंना इशारा दिला आहे. "विरोधकांना सध्या केवळ मीच दिसत आहे. अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आता सावज टप्प्यात आलं आहे. वाट बघा, आता सोडणार नाही," अशा इशारा गोरे यांनी दिला.
जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, "सध्या राज्यात मला अडवण्यासाठी रोज नदीकाठी पूजा घाततात. काळ्या बाहुल्या बांधत आहेत. मात्र, कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधल्या तरी काहीच होणार नाही. जोपर्यंत जनता सोबत आहे, तोपर्यंत काहीही फरक पडत नाही. कारण, निवडणुका आल्या की, जयकुमार गोरेंवर केस दाखल झाली नाही, असे एकदाही झालं नाही. अनेक अडचणी आणल्या जात आहेत. मात्र, मी घाबरणाऱ्यांपैकी नाही. मुळात मी कोणाच्या नादाला लागत नाही, माझ्या नादाला लागल्यास तर सोडत नाही," असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सावज टप्प्यात आल्याशिवाय मी विषयाला हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलं आहे. थोडीशी वाट बघा, पुढे काय काय होणार, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. माझ्या पाठिशी देवाभाऊ उभा आहे, त्यामुळे कोणतेही प्रश्न राहणार नाही, असेही ते म्हणाले.