Maharashtra Political Crisis: “नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 15:47 IST2022-08-28T15:46:44+5:302022-08-28T15:47:07+5:30
Maharashtra Political Crisis: अनिल परबांशी संबंधित रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली.

Maharashtra Political Crisis: “नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी
Maharashtra Political Crisis: नोएडामध्ये बांधलेले सुपरटेक ट्विन टॉवर्स अखेर कोसळले. १३ वर्षांमध्ये बांधलेल्या या गगनचुंबी इमारती अगदी काही सेकंदात कोसळल्या. हाच धागा पकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचेही रिसॉर्ट अशाच पद्धतीने जमीनदोस्त करावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, राज्यात सत्तांत्तर होताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिल्यानंतर हालचालींना वेग आला. आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक पाडूया, अशा प्रकारचे सूचक वक्तव्य करत किरीट सोमय्या मुंबईतून निघून दापोलीत दाखल झाले.
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये, अनिल परब यांच्याशी संबंधित रिसॉर्ट्स पाडण्याचे वेळापत्रक आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे. ही रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याचा खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. नोएडा ट्विन टॉवर पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तसाच अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्याचासाठी करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांना सुचवले, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर रिसॉर्ट
या रिसॉर्टमधील साहित्याची हलवाहलव केल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचे कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून समुद्रकिनाऱ्यावर हे साई रिसॉर्ट बांधण्यात आले आहे. ते पाडण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या मुरुड येथे आढावा घेण्यासाठी दाखल झाले.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित दापोलीतील दोन रिसॉर्टवर कारवाई करत, ती जमीनदोस्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर तब्बल ६३ लाखांचा दंडही आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला आता नंबर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडणार, असे सोमय्या यांनी ट्विट केले होते.