BJP News: दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. मात्र, राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसलेले पाहायला मिळाले. यावरून भाजपाने ठाकरे गटावर टीका केली आहे.
भाजपासोबत उद्धव ठाकरे होते, किती सन्मान होता मातोश्री व उद्धव ठाकरे यांना… देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्री वर जाऊन सन्मान करीत. २०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. हिंदुत्व सोडले. विचारधारा सोडली त्यातून मान गेला. सन्मान गेला, या शब्दांत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत ठाकरे गटावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?
कट टू २०२५ आता पहा. महाविकास आघाडीत आल्या पासून राहूल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही. मा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी काँग्रेस नेता गेला? उत्तर नाही. मा बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसने हिंदुह्दयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही. दरवर्षी आता उद्धव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात. विचारधारा सोडली त्यातून मान गेला. सन्मान गेला. हातात पडले काय तर, आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग, असा हल्लाबोल केशव उपाध्ये यांनी केला.
दरम्यान, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन सुरू होते. उद्धव ठाकरे यांना पुढे बसवण्यात आले होते. स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्याने आम्ही सगळेच पाठीमागे गेलो. ती बसायची जागा नव्हती. तिथे प्रेझेंटेशन सुरू होते. भाजपचे जे फालतू लोक आहेत त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरे यांचे तुम्ही आणखी फोटो पाहिले नाहीत का, असे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले.