“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:40 IST2025-07-22T14:38:45+5:302025-07-22T14:40:19+5:30

Honey Trap Issue Politics: या फोटोची सीबीआय चौकशी करा अशी मागणी संजय राऊत करणार का? असा सवाल भाजपाने केला आहे.

bjp keshav upadhye replied thackeray group and ncp sp group over honey trap issue case | “यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार

Honey Trap Issue Politics: नाशिकसह राज्यातील काही राजकीय नेते, आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सेक्स स्कॅण्डल आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या चर्चेनंतर खळबळ उडाली. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. या सर्व प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू झाल्याची चर्चा आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून टीका केली होती. तसेच एक फोटो शेअर करत काही आरोप केले होते. याला आता भाजपाकडून फोटोच शेअर करत उत्तर दिले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दूध का दूध पानी का पानी होईल! ४ मंत्री अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले, अशी एक पोस्ट संजय राऊत यांनी एक्सवर केली. याला आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत पलटवार केला.

मग इथे पण हनी ट्रॅप म्हणायचे का?

मंत्री गिरीष महाजन यांच्या सोबतच्या एकाचा फोटो ट्वीट करीत संजय राऊत यांनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केली व कथित हनी ट्रॅप समोर येईल म्हटले आहे. आता पुढील फोटोत सुप्रिया सुळे व आदित्य ठाकरे यांच्या सोबत जो काळे नामक व्यक्ती दिसतेय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मग या नेत्यांचा काळेच्या कृत्यात सहभाग म्हणायचे की पाठिंबा आहे म्हणायचे? काळे तर शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे, मग इथे पण हनी ट्रॅप म्हणायचे का? या फोटोची सीबीआय चौकशी करा अशी मागणी संजय राऊत करणार का? सामना मध्ये अग्रलेख लिहिणार का? फोटो आहेत याचा अर्थ त्या व्यक्तीच्या कृत्यात सहभाग नसतो, असे केशव उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. हनी ट्रॅपद्वारे राज्य सरकारशी संबंधित काही गोपनीय माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारने यावर निवेदन करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना, कुठला हनी ट्रॅप आणला? नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे दिला पाहिजे, असे सांगत ना हनी आहे, ना ट्रॅप. या संदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Web Title: bjp keshav upadhye replied thackeray group and ncp sp group over honey trap issue case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.